
कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरुच असुन,संततधार आणि चोवीस तास रिपरिप कोसळणाऱ्या पावसामुळे, जनजीवन अक्षरशः विस्कळित झाले आहे. ठिकठिकाणी लाॅकडाऊनसदृश्य वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान ऐतिहासिक राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे दुपारी उघडले असून, पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.तर दुपारी तीन पर्यंत पंचगंगेच्या पाणीपातळीतही तब्बल दहा फुटांची वाढ होऊन,१७ बंधारे पाण्याखाली गेले होते.
जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासात पडलेल्या पावसाच्या नोंदीनुसार,गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक १०८ मिमी पावसाची नोंद झाली आहे.तर हातकणंगले-६२.३८,शिरोळ-८०. ८६,पन्हाळा-८४.२९,शाहूवाडी-५३,राधानगरी-३५.८३,करवीर-९२.५५,कागल-४९.४३,गडहिंग्लज -३५.५७, भुदरगड-२१.८०, आजरा-२९ आणि चंदगड तालुक्यात २४.६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सकाळी ७ च्या प्राप्त अहवालानुसार,राधानगरी धरणात २३४.१६ दलघमी पाणीसाठा असुन,या धरणातुन १४००, सातारा जिल्ह्यातील कोयनेतून ३४ हजार २११ आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणातून १ लाख ११ हजार २७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.पंचगंगा नदीवरील राजाराम,सुर्वे,रूई,इचलकरंजी ,तेरवाड व शिरोळ,भोगावती नदीवरील खडक कोगे असे सात बंधारे पाण्याखाली गेले होते.तर दुपारी सव्वा एकच्या सुमारास राधानगरी धरणाचे ३ व ६ क्रमांकाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले .त्यामधुन ४ हजार २५६ क्युसेक विसर्ग सुरू होता.काल रात्री उशिरा पंचगंगेच्या पाणीपातळीत एक तर रातोरात ७ फुटांची वाढ होऊन सात बंधारे पाण्याखाली गेले होते.दुपारी तीनच्या सुमारास आणखी तीन फुटांची वाढ होऊन,२०.७ फुट अशी पातळी वाढली होती.तर एकुण १७ बंधारे पाण्याखाली गेले होते.पावसाची हजेरी पाहता नद्यांच्या पातळीत आणखी वाढ होऊन, मोठ्या संख्येने बंधारेही पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.
खळ्यात तळे- शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
महापुराच्या नुकसानीनंतर लाॅकडाऊनच्या काळातही कशीबशी टिकवलेल्या आणि हाता- तोंडाशी आलेल्या शेतीपिकांवर परतीच्या पावसाने अक्षरशः पाणी फिरले आहे.जिल्ह्यातील खरीप पिकांना मोठा फटका बसला असून,भात, सोयाबीन,नाचणी अशा पिकांच्या मळणीसाठी केलेल्या खळ्यात तळे झाल्याने,शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.त्यामुळे तातडीने या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडुन होऊ लागली आहे.पीकविमा योजनेच्या भरपाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.































































