दुर्दैवी… सुट्टीसाठी आजोळी आलेल्या दोन सख्ख्या भावांचा तलावात बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अहमदपूर तालुक्यातील टाकळगाव (का) येथे दोन सख्ख्या भावांचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. रोहन राम वडमारे (18 वर्ष) व रोहित राम वडमारे (16 वर्ष) अशी मृतांची नावे आहेत.

रोहन वडमारे व रोहित वडमारे हे दोघे संभाजीनगर येथील रामनगरात राहतात. सुट्टीचे दिवस असल्याने हे दोघे आपल्या आजोळी टाकळगाव (का) येथे आले होते. सोमवारी रोजी हे दोघे दुपारी दोनच्या सुमारास आजोबा सोबत जनावरे घेऊन शेताकडे गेले. शेताच्या बाजूला असलेल्या पाझर तलाव क्र. 5 मध्ये उतरले परंतु पुढे जाताना तलावातील खदानीचा अंदाज नसल्याने ते खोलवर बुडाले.

रोहन व रोहित या दोघांनी तलावाजवळ काढून ठेवलेल्या कपड्यांमुळे ते तलावातील पाण्यात बुडाल्याचा अंदाज आला व शोधाशोध चालू झाली. सोमवारी दुपारी 3 वाजता रोहनचा तर मंगळवारी दुपारी एक वाजता रोहितचा मृतदेह सापडला. दरम्यान, राज्याचे माजीमंत्री बाळासाहेब जाधव यांना या घटनेची माहीती समजताच त्यांनी टाकळगाव (का) येथे जाऊन मयताचे आजोबा संतराम कांबळे व मामा विक्रम कांबळे यांची भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, सहायक पोलिस निरीक्षक के. एन. चव्हाण, तलाठी जाधव याची घटनास्थळी उपस्थिती होती.