मुंबई सेंट्रलचा सिटी सेंटर मॉल 16 तास धुमसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई सेंट्रलच्या ‘सिटी सेंटर मॉल’ला गुरुवारी रात्री नऊच्या सुमाराला लागलेली आग आज दुसऱया दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत म्हणजे तब्बल 16 तास धुमसत होती. सुरुवातीला छोटी भासणारी आग उत्तरोत्तर वाढत गेल्याने मुंबईतील संपूर्ण अग्निशमन दलाची यंत्रणाच (ब्रिगेड कॉल) हा धुमसता अग्नी शांत करण्यासाठी कामाला लागली. विविध केंद्रांतील 24 फायर इंजिने, 17 जंबो टँक, 50 वाहने आणि 250 जवानांसह अग्निशमन दलप्रमुखांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

दरम्यान, मॉलबाजूच्या इमारतीमधील 3500 रहिवाशांना सुरक्षितपणे मोकळय़ा मैदानात स्थलांतरित करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱयासह पाच जण किरकोळ जखमी झाले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

मुंबई सेंट्रलजवळील तीन मजली सिटी सेंटर मॉलच्या दुसऱया मजल्यावर गुरुवारी रात्री 8.53 वाजताच्या सुमाराला आग लागली. यावेळी मॉल बंद होता. या मजल्यावर मोबाईल, प्रिंटर, स्टेशनरी, फर्निचर आणि इतर साहित्यांची दुकाने असल्यामुळे सुरुवातीला छोटी भासणारी आग नंतर उत्तरोत्तर वाढत गेली. अग्निशमन दलाने साडेपाच तास अथक प्रयत्न करूनही आग आटोक्यात आली नाही.

प्रचंड धुरामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आग वाढून ती तिसऱया मजल्यापर्यंत पोहोचली. अखेर प्रचंड धूर आणि आगीमुळे मध्यरात्री पावणेतीनच्या सुमाराला ‘ब्रिगेड कॉल’ जाहीर करत संपूर्ण अग्निशमन दलाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर ही आग विझवण्यासाठी कामाला लागली. आगीचा धोका लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या सूचनेनुसार मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने मॉलजवळच्या ‘ऑर्किड एन्क्लेव’ या 55 मजली इमारतीमधील सुमारे 3500 रहिवाशांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने जवळच्या मैदानामध्ये स्थलांतर केले. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमाराला ही आग आटोक्यात आली. मात्र, आग नियंत्रणात आली असली तरी पुलिंग ऑपरेशन पुढील अनेक तास सुरूच राहणार आहे, अशी माहिती मुंबई अग्निशमन दलप्रमुख शशिकांत काळे यांनी दिली.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांनी गुरुवारी रात्री उशिरा भेट देऊन पाहणी केली आणि आढावा घेतला.

अधिकाऱयासह पाच जण जखमी
मॉलमधील आग इतरत्र पसरू नये यासाठी अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांसह जवानांनी मेहनत घेतली. मात्र, आग विझवताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱयांसह पाच जण यात किरकोळ जखमी झाले. रुग्णालयातील उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. यात अग्निशमन दल अधिकारी गिरकर (50) यांच्यासह जवान भाऊसाहेब बदाने (26), संदीप शिर्के किरकोळ जखमी झाले. जवान रवींद्र चौगुले (53) यांच्या हाताला मार लागल्याने ते जखमी झाले, तर श्यामराव बंजारा (34) यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना तत्काळ जे. जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांना रुग्णालयामधून सोडण्यात आले.