म्हाडाच्या 38 संक्रमण शिबिरांचा होणार पुनर्विकास; अतिरिक्त 30 टक्के गाळे उपलब्ध होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील म्हाडाच्या 38 संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास केला जाणार असून त्या माध्यमातून मूळ गाळ्यांबरोबरच म्हाडाला अतिरिक्त 30 टक्के गाळे उपलब्ध होणार आहेत. यासाठी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सलटंट (पीएमसी) नेमण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. म्हाडाकडे सध्या 58 संक्रमण शिबिरे असून आतापर्यंत त्यातील 20 संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास करण्यात आला आहे.

मुंबईत अनेक उपकरप्राप्त जुन्या इमारती असून अशा इमारती धोकादायक बनल्या आहेत. अशा इमारतींची दुरुस्ती, पुननिर्माण करणे हे म्हाडाचे महत्त्वाचे काम आहे. मात्र, हे काम करत असताना यात राहणाऱ्या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी त्यांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करणे आवश्यक असते. त्यासाठी पुरेशा संक्रमण शिबिरांची आवश्यकता असते.

त्या पार्श्वभूमीवर, म्हाडाच्या 38 संक्रमण शिबिरांचा पुनर्विकास केला जावा, या पुनर्विकासातून म्हाडाच्या वाटय़ाचे गाळे मिळणार असून त्याशिवाय अतिरिक्त 30 ते 40 टक्के गाळे म्हाडाला उपलब्ध होतील, त्यांचा समावेश लॉटरीत न करता ते थेट म्हाडाला मिळावेत, अशी मागणी म्हाडाच्या उपाध्यक्षांबरोबर झालेल्या बैठकीत केली होती. ती मंजूर करण्यात आली आहे, अशी माहिती इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी दिली.

धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना प्राधान्य
मुंबईत पुरेशी संक्रमण शिबिरे नाहीत तसेच आहेत ती संक्रमण शिबिरे धोकादायक इमारतींमध्ये राहत असलेल्या रहिवाशांच्या परिसरांपासून लांब असल्यामुळे हे रहिवासी अशा संक्रमण शिबिरांमध्ये जात नाहीत. त्या पार्श्वभूमीवर, नव्या संक्रमण शिबिरांतील गाळ्यांमध्ये अशा धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी, ही केलेली मागणीही मान्य करण्यात आली आहे, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली.