
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील चापडगाव येथे सासऱ्यानेच आपल्या विधवा सुनेचा आणि प्रियकराचा काटा काढला. तीन वर्षांपासून प्रेम संबंधात असणाऱ्या भागवत प्रल्हाद हरबक व मारिया विनोद लालझरे या विवाहित प्रेमीयुगुच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
भागवत प्रल्हाद हरबक व मारिया विनोद लालझरे यांचे 3 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या अनैतिक संबंधाला सासरे बथुवेल संपत लालझरे यांचा विरोध होता. त्यामुळे दोघांनी आपल्या जीवितास धोका असल्याची तक्रार पोलिसात केलेली होती. घात होऊ नये म्हणून दोघेही 6 महिन्यांपासून एकत्रच राहत होते.
मात्र बुधवारी 28 ऑक्टोंंबर रोजी एका कार्यक्रमाहून दुचाकीवरून जात असताना राणी उंचेगाव-चापडगाव शिवारात सकाळच्या सुमारास त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून हत्या करण्यात आली. बथुवेल लालझरे याच्या सांगण्यावरून त्यांचा दुसरा मुलगा विकास बथुवेल लालझरे याने ट्रॅक्टरने दुचाकी (एमएच 21, एके 1977) हिला धडक दिली आणि दोघांची चिरडून हत्या केली.
या प्रकरणी राधा भागवत हरबक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात दोघांचा पत्ता कोणी कॉल करून सांगितला? ट्रॅक्टर कोठून आणला? दोघे याच मार्गाने येणार होते त्याची पूर्वकल्पना कोणी दिली होती? याबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर यांनी दिली.

































































