लिव्ह इन जोडीदाराच्या तीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील बुराडी परिसरात एक भीषण घटना घडल्याचं वृत्त आहे. लिव्ह इन पद्धतीने राहणाऱ्या एका जोडीतील माणसाने महिलेच्या तीन वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार करून त्याची हत्या केली आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, या घटनेतील महिलेचं 11 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. या नात्यात तिला तीन मुलं झाली. व्यवसायाने ब्युटिशियन असलेल्या या महिलेची ओळख काही काळापूर्वी रेहान उर्फ शुवान याच्याशी झाली होती.

रेहान हा कॅबचालक आहे. रेहानसोबत तिचे अनैतिक संबंध सुरू झाले. त्यावरून तिची तिच्या पतीशी भांडणं होऊ लागली. अखेर ती पतीच्या घरातून बाहेर पडून रेहानसोबत लिव्ह इन नात्यात राहू लागली.

महिलेच्या म्हणण्यानुसार, 29 ऑक्टोबर रोजी तिचा तीन वर्षांचा मुलगा खूप रडत होता. त्यावर रेहान तिला मुलाला फिरवून आणतो असं म्हणाला आणि त्याला घेऊन घराबाहेर पडला. या दरम्यान त्याने मुलावर लैंगिक अत्याचार केले आणि त्याची गळा दाबून हत्या केली.

थोड्यावेळाने तो मुलाला घेऊन घरी परतला तेव्हा मुलगा बेशुद्ध पडला होता आणि त्याच्या शरीरावर जखमांच्या खुणा होत्या. महिलेने जेव्हा त्याला याचं कारण विचारलं तेव्हा रेहानने तिला मुलाला औषधांच्या डोसची रिएक्शन झाल्याचं सांगितलं. त्यामुळे महिलेने त्वरित मुलाला रुग्णालयात दाखल केलं. तिथे मुलाला मृत घोषित करण्यात आलं.

या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यानंतर मुलावर अत्याचार झाल्याचं निष्पन्न झालं. दरम्यान, रेहान फरार झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी रेहानवर पोक्सो कायद्यांतर्गत आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आणि त्याला अटक केली आहे.