23 नोव्हेंबरपासून शाळेची घंटा वाजणार, दहावी-बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

23 नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा शाळेची घंटा वाजणार आहे. राज्यभरात हळूहळू अनलॉकची प्रक्रिया सुरू असून याच पार्श्वभूमीवर नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांच्याकडून परवानगी आल्यानंतरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

शाळा बंद असल्यातरी सध्या शिक्षण ऑनलाईन पद्धतीने सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती पाहूनच 23 नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एसओपी (नियमावली) शिक्षण विभागाने तयार केली आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने निर्गमित केलेल्या सुचनांचे पालन करूनच शाळा सुरू करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. यासंदर्भात पालकांची परवानगी घेऊन तसेच आरोग्य विषयक उपाययोजना करूनच शाळा सुरू करण्यात येतील असेही शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दहावी, बारावीच्या परीक्षा मे महिन्यात
कोरोनामुळे यंदा दहावी, बारावीच्या अभ्यासाला उशीराने सुरूवात झाली. तसेच अभ्यासक्रमही 25 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे. त्यामुळे किमान 23 नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करावेत, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे महिन्यात घेता येतील, अशी माहिती कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आहे. जुलै महिन्यानंतर पावसाचे सावट असते. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यात शाळा सुरू करण्यात आल्या तर अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, असे मंत्रिमंडळ बैठकीत शिक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.

येत्या दोन दिवसांत अकरावी प्रवेशाचा निर्णय
वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेशाबाबतही माहिती दिली. याबाबतचाही प्रस्ताव कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देखील अकरावी प्रवेशाबाबत चर्चा झाली. अकरावी प्रवेशाबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो आणि पुढील दोन तीन दिवसात अकरावी प्रवेश सुरू केले जाऊ शकतात असेही त्या म्हणाल्या.