पवई आयआयटीची ऑनलाईन शिकवणी 16 नोव्हेंबरपासून 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवण्याचा निर्णय देशात सर्वप्रथम पवईच्या आयआयटी मुंबईने घेतला होता. आयआयटी मुंबईतील पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या पहिल्या सत्राचे ऑनलाईन वर्ग 16 नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत.

ऑनलाईन वर्ग चांगल्या पध्दतीने व्हावेत आणि विद्यार्थ्यांना काही तक्रार राहू नये याची काळजी आयआयटी मुंबईने घेतली आहे. 11 नोव्हेंबरपासून प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्प साधून त्यांना ऑनलाईन शिकवणीसाठी आवश्यक ती सर्व माहिती संस्थेकडून दिली जाणार आहे असे संस्थेचे संचालक डॉ. सुभाशिष चौधरी यांनी सांगितले.

पहिला आठवडा हा ‘झिरो विक’ राहणार आहे. म्हणजेच त्या आठवडय़ात विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गात कसे उपस्थित व्हावे, परीक्षा कशी द्यावी याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. आयआयटी मुंबईची शैक्षणिक सत्रे ही दरवर्षी ऑगस्ट ते डिसेंबर आणि जानेवारी ते जून अशी असतात. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना संकटामुळे पदवीपूर्व अभ्यासक्रमाची सत्रे नोव्हेंबर ते मार्च आणि मार्च ते जुलै अशी घेतली जाणार आहेत.