मंदिरे, मशीद, चर्चच्या ट्रस्टना एकत्र आणणार; धार्मिक सलोख्यासाठी माहीम दर्ग्याचा पुढाकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील प्रसिद्ध माहीम दर्ग्याच्या व्यवस्थापनाने धार्मिक सलोख्यासाठी पुढाकार घेतला आहे. शहरातील सर्व धार्मिक स्थळांच्या ट्रस्ट, व्यवस्थापनांना एकत्र आणले जाणार आहे. यासाठी मंदिरे, मशिद, चर्च, गुरुद्वार आणि बुद्ध विहारच्या ट्रस्टसाठी बोलणी सुरू करण्यात आली आहे. धार्मिक द्वेष आणि भेदभाव संपवण्याच्या हेतूने शांती आणि सद्भावनेचा संदेश सर्व धर्मियांपर्यंत पोहोचवला जाणार आहे.

केवळ संकट काळातच नव्हे, तर संपूर्ण वर्षभर धार्मिक स्थळांचे पदाधिकारी एकत्र काम करतील, असा प्रस्ताव माहीम दग्र्याच्या ट्रस्टने बनवला आहे. प्रत्येक धर्मातील बुद्धीजिवी लोकांना एकत्र आणणे हाच मोहिमेचा प्रमुख हेतू आहे. आम्ही लोकांचे समुपदेशन करणार आहोत, शांती-सद्भावनेनेच मानवी जीवन समृद्ध होऊ शकते हे सर्व धर्मियांना पटवून देणार आहोत, असे पीर मकदूम साहेब चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त सुहेल कंडवानी यांनी सांगितले.

यासंदर्भात आपण शहरातील मंदिरे, चर्च आणि बुद्ध विहारच्या पदाधिकाऱ्यांशी प्राथमिक चर्चा केली आहे. सर्वांनीच या प्रस्तावाचे स्वागत केले आहे, असेही कंडवानी यांनी स्पष्ट केले. माहिम दर्ग्याशी मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातील जवळपास 80 टक्के दर्गा व मशिद संलग्न आहेत. त्यामुळे मोहिमेतून धार्मिक सलोख्याचा संदेश राज्यभर पोहोचू शकणार आहे.

प्रस्तावात नेमके काय आहे?

  • इतर धर्मांविषयी असलेले गैरसमज आणि द्वेष संपवण्यासाठी जनजागृती केली जाईल. यासाठी विशेष अभ्यासक्रम तयार केला जाईल.
  • सर्व धर्मियांना एकत्र आणून विविध धार्मिक स्थळांना भेटी दिल्या जातील. यातून वेगवेगळ्या धर्मातील लोक एकत्र येऊन चर्चा करतील, एकमेकांच्या भावना जाणून घेतील.
  • सलोख्यासाठी धार्मिक स्थळांच्या पदाधिकाऱ्यांचे समुपदेशन केले जाईल.