
कोरोनाकाळात लोकप्रिय ठरलेल्या अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, नेटफ्लिक्स, डिस्ने-हॉटस्टार, अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता सरकार नजर ठेवणार आहे. तसेच ऑनलाईन न्युज पोर्टलही सरकारच्या ‘लाईन’वर असणार आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती-प्रसारण मंत्रालयाने अधिसूचना जारी केली असून, त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी केली आहे.
घटनेतील कलम 77 च्या क्लॉज (3) नुसार ही सुधारित अधिसूचना काढण्यात आली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन न्युज पोर्टलवर यापूर्वी कोणत्याही कायद्याचे बंधन नव्हते. त्यासाठी कोणतीही स्वायत्ता नियंत्रण ठेवणारी यंत्रणा नव्हती.
सुप्रीम कोर्टात याचिका
ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाईन पोर्टलवर प्रसारित होणारा मजकूर वादग्रस्त आणि अश्लीलतेकडे झुकणारा असतो. त्यावर सरकारने नियंत्रण ठेवावे अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आली होती. त्यावर ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन न्युज पोर्टलवर नियंत्रण आणण्याचा विचार सुरू असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले होते.
कोरोनाकाळात लोकप्रिय
- नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, अल्ट बालाजी, हॉटस्टार यावर प्रसारित झालेल्या वेबसिरिज प्रचंड गाजल्या तसेच काही वेबसिरिजमधील कंटेन्ट वादग्रस्तही ठरल्या.
- कोरोना लॉकडाऊन काळात लोक अनेक दिवस घरात होते. चित्रपट गृहे, मॉल्स, मल्टीप्लेक्स, नाटय़गृहे बंद होती. याकाळात लोकांचे मनोरंजनाचे साधन ओटीटी प्लॅटफॉर्म होते.
निर्बंध येणार; सत्यता पडताळणार
ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱया वेबसिरिजचा कंटेन्ट, त्याची सत्यता याची पडताळणी आता सरकारी पातळीवर होणार आहे. तसेच ऑनलाईन न्युज पोर्टलवर प्रसारीत होणारा मजकूर आणि व्हिडीओवरही निर्बंध येण्याची शक्यता आहे.


























































