बॉलीवूडला आणखी एक धक्का, अभिनेते आसिफ बसरा यांची धरमशालात आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बॉलीवूडला यंदाचे 2020 हे वर्षे अतिशय खराब आणि दुखःद ठरले आहे. कोरोना संकटात अनेक लोकप्रिय कलाकारांच्या मृत्यूने बॉलीवूड मोठय़ा धक्क्यात असतानाच ज्येष्ठ चित्रपट आणि रंगभूमी कलाकार आसिफ बसरा यांच्या गूढ मृत्यूचे वृत्त आले आहे.

53 वर्षीय आसिफ यांनी हिमाचल प्रदेशातील धर्मशाला येथे भाडय़ाच्या घरात पुत्र्याच्या पट्टय़ाने आपली मान आवळून घेत आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

आसिफ यांच्या या आत्महत्येमागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांनी मॅक्लोडगंजच्या जोगिबाडा रोड स्थित एका पॅफेच्या शेजारी आपले जीवन संपवले.

1967 साली महाराष्ट्राच्या अमरावतीमध्ये जन्मलेले आसिफ बसरा आपले अभिनयातील भवितव्य घडवण्यासाठी 1989 मध्ये मुंबईत आले होते.

त्यांनी रंगभूमीवर हिंदी, उर्दू आणि इंग्रजी नाटकातून भूमिका केल्या. अनेक बॉलीवूडपटातून भूमिका करणाऱया बसरा यांच्या 1993च्या मुंबई बॉम्बस्फोटांवरील ‘ब्लॅक फ्रायडे’ आणि 2002च्या गुजरात दंगलीवर आधारित ‘परझानिया’ चित्रपटातील भूमिका गाजल्या होत्या.

पाळीव कुत्र्याला फिरवून आणल्यावर लावून घेतला गळफास

गुरुवारी दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेले होते. कुत्र्याला फिरवून आणल्यानंतर ते घरी परतले आणि नंतर त्याच पट्टय़ाला लटकून त्यांनी गळफास लावून घेतला.

सुरुवातीच्या तपासात हा प्रकार आत्महत्येचा असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र पोलीस या प्रकरणी पुढील तपास कसून करीत आहेत.