
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झारखंड सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तलाव आणि नदी काठी छटपुजेवर राज्य सरकारने बंदी घातली आहे.
छठपुजेच्या निमित्ताने भाविक मोठ्या संख्येने तलाव,नदी किंवा पाण्याच्या स्रोताजवळ एकत्र येतात. जल आणि सुर्योदयाला नमस्कार करून स्नान करतात आणि तिथेच पूजा करतात. अशावेळी कोरोना पसरण्याची मोठी भिती आहे. म्हणून राज्य सरकारने छठपुजेवर बंदी आणली आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या सूचनेनुसार पाण्याच्या माध्यमातून कोरोना पसरण्याची भिती आहे. म्हणून राज्यात आतापर्यंत स्विमिंग पूल बंद ठेवण्यात आले आहे. छठपुजेला भाविक जल स्रोताजवळ स्नान करतात, तसेच या ठिकाणी गर्दीला नियंत्रित करणे कठीण असते. म्हणून राज्य सरकारने सार्वजनिक ठिकाणी छठ पुजा, पुजेचे आयोजन करण्यावर बंदी घातली आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी जल स्त्रोतांजवाळ दुकान, स्टॉल लावणे, विद्युत रोषणाई करणे, फटाके लावणे यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच छठपुजेच्या निमित्ताने सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यावरही बंदी घातली आहे.





























































