
टीव्ही वृत्तवाहिन्यांसाठी नियमावली आणण्याचा विचार करण्याबरोबरच वृत्तवाहिन्यांसाठी नियामक यंत्रणा बळकट करण्याबाबत सरकार विचार करत आहे, असे केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले. एका वेबिनारला संबोधित करताना जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली. सरकारला प्रसारमाध्यमांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही किंवा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्यात येणार नाहीत. मात्र, वृत्तवाहिन्यांवर देखरेख ठेवण्याची गरज व्यक्त होत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याचा मुद्दा चर्चेत येत आहे. काही वृत्तवाहिन्यांवर कसलेच बंधन नाही.ते अयोग्य आणि दिशाभूल करणारे वृत्त देत आहेत. ते चांगले नाही. प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ही वृत्तपत्र नियमन करणारी यंत्रणा आहे. त्यात वृत्तपत्र मालक, संपादक, पत्रकार, छायाचित्रकार आणि जनतेचे प्रतिनिधी आहेत. मात्र, वृत्तवाहिन्यांबाबत अशी यंत्रणा नाही. अशी यंत्रणा असावी, अशी मागणी होत असल्याने त्याबाबत विचार केला जात आहे, असे जावडेकर यांनी सांगितले.
वृत्तवाहिन्यांवरील वृत्ताचे नियमन करण्यासाठी प्रेस कौन्सिलसारख्या संस्था नाही. त्यामुळे काही वाहिन्यांवर कोणतेही बंधन नाही. या माध्यमांची जनतेपर्यंत पोहचण्याची ताकद आहे. त्यामुळे जनतेपर्यंत अयोग्य आणि दिशाभूल करणारे वृत्त पोहचू नये, यासाठी योग्य व्यवस्था अस्तित्त्वात आणण्याची गरज जावडेकर यांनी व्यक्त केली. डिजिटल आणि ओटीटी प्लॅटफॉर्मबाबतही अशीच समस्या असल्याचे ते म्हणाले.
टीव्ही रेटिंग यंत्रणा बळकट करण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालय विचार करीत असल्याचेही ते म्हणाले. आता यावर देखरेख ठेवण्याची वेळ आली आहे. प्रसार माध्यमांमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारचा विचार नाही. या माध्यमांच्या नियमनासाठी सूचना करण्यासाठी समिती नेमली आहे. तिचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लेखी संदेशाद्वारे कोरोनाविरोधातील लढाईत प्रसारमाध्यमांच्या योगदानाचे कौतुक केले. जनजागृती करण्यासोबत साथीच्या रोगाचा परिणाम कमी करण्यात प्रसारमाध्यमांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, असे त्यांनी संदेशात म्हटले आहे. व्हिडीओ-संदेशामध्ये उपराष्ट्रपती एम. वंकय्या नायडू यांनी लोकशाहीत प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्यामुळे लोकशाहीत मुक्त आणि निर्भय वातावरण तयार होत असल्याचे ते म्हणाले. प्रसारमाध्यमांनी निष्पक्ष, वस्तुनिष्ठ आणि अचूक काम करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

























































