दिल्लीत पुन्हा लॉकडाऊनची शक्यता; अनेक गोष्टींवर निर्बंध येणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे. त्यामुळे दिल्लीत पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट बनण्याची शक्यता असलेले आणि बाजाराच्या परिसरात लॉकडाऊन लावण्याची परवानगी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे मागितली आहे.

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी लटकडाऊन जारी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नसून वैद्यकीय उपाययोजना हाच उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने चाचण्यांची संख्या वाढवणे, आयसीयूचे बेड वाढवणे यासारख्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

दिल्लीत विवाह सोहळा आणि इतर समारंभासाठी उपस्थितांची संख्या 200 वरून 50 करण्यात येण्याची शक्यता आहे. बाजार, गर्दीची ठिकाणे आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. कोरोनाचा वाढता प्रकोप बघता सरकारने तातडीने बाजारपेठा बंद करण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. मेट्रो सेवेबाबत सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा, मेट्रोसेवा सुरू ठेवायची असेल तर सरकसकट सुरू करा, अन्यथा बंद ठेवा, याबाबत ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

दिल्लीत पुन्हा लटकडाऊनची शक्यता असल्याने व्यापारी वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. सणाच्या काळात थोडीफार कमाई होण्याची शक्यता असताना सरकार बाजारपेठा बंद करण्याच्या तयारीत असल्याने मोठा फटका बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दिल्लीत बाहेरून प्रवेश करणाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. कंटेन्मेंट झोन आणि हॉटस्पॉटवर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे दिल्लीत लॉकडाऊन पुन्हा लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर उपमुख्यमंत्री आणि काही नेत्यांनी लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान लॉकडाऊनबाबत परिस्थिती स्पष्ट नसली तरी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे शहरात काही निर्बंध लागू करण्यात येण्याची शक्यता आहे.