
लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांचे पैसे सुरक्षित असून त्यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेकडे पुरेसा निधी आहे असे रिझर्व्ह बँकेने नेमलेले प्रशासक टी. एन. मनोहरन यांनी स्पष्ट केले. लक्ष्मी विलास बँकेचे डीबीएस इंडिया बँकेत विलिनिकरण करण्यात येणार आहे. विलिनिकरणाची प्रक्रिया ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल असा विश्वासही मनोहरन यांनी खातेदारांना दिला.
रिझर्व्ह बँकेने मनोहरन यांची लक्ष्मी विलास बँकेवर प्रशासक म्हणून मंगळवारी नेमणूक केली. आपली जमापुंजी सुरक्षित असल्याचा विश्वास खातेदारांना देणे हे आपले प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. लक्ष्मी विलास बँकेकडे 20 हजार कोटी रुपये जमा आहेत तर बँकेने 17 हजार कोटी रुपयांची कर्जे दिली आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
रिझर्व्ह बँकेने निर्बंध घातल्याने लक्ष्मी विलास बँकेच्या खातेदारांना 16 डिसेंबरपर्यंत आपल्या खात्यामधून फक्त 25 हजार रुपयेच काढता येणार आहे. मात्र 16 डिसेंबरपूर्वीच बँकेची विलिनीकरण प्रक्रिया पूर्ण होईल असा विश्वास मनोहरन यांनी व्यक्त केला.
बँकेबाहेर ग्राहकांच्या रांगा
लक्ष्मी विलास बँकेवर निर्बंध घातले गेल्याचे वृत्त समजताच सकाळपासूनच बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. ग्राहकांच्या चेहऱयावर आपल्या जमापुंजीबद्दल चिंता दाटली होती. दरम्यान रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांनंतर बँकेचे शेअर्स आज 20 टक्क्यांनी घसरून 12.4 रुपयांवर पोहोचले.





























































