कान टोचण्याच्या बहाण्याने चिमुरड्याचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक, बाळ सुखरूप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बाळाचे कान टोचविण्याच्या बहाण्याने त्याच्या आईला नाश्ता करण्यात गुंतवून चार महिन्याच्या बाळाचे अपहरण केलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली. तिच्याकडून बाळ घेऊन कुटूंबियाच्या ताब्यात दिल्याची माहिती हडपसर पोलिसांनी दिली आहे.

अरुणा राजेंद्र पवार (वय – 36, रा. मांजरी बुद्रूक ) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी 23 वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

फिर्यादी महिलेचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. त्यामुळे भांडणाचा राग मनात धरून महिलेने चार महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले होते. लोणीतील रहिवासी असलेली ही महिला नगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास केला. त्याचवेळी आरोपी महिला अरूणा त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली.

काही वेळाने तिने फिर्यादी महिलेशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर अरूणाने फिर्यादी महिलेच्या बाळाचे कौतुक करीत कान टोचविण्याचा बहाणा करीत तिला हडपसर परिसरात नेले.

हडपसरमध्ये गेल्यानंतर अरूणासह महिलेने चायनीज हॉटेलमध्ये जेवण केले. त्यानंतर अरूणाने बाळाला खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळ स्वतःजवळ घेतले. त्यानंतर अरूणा परत आलीच नाही.

बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात तिचा शोध घेतला पण आढळून आली नाही. त्यानंतर महिलेने हडपसर पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तत्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरू केला. 45 सीसीटीव्हीचे फुटेज आणि फोटोनुसार पोलिसांनी अरूणाचा शोध घेत तिला ताब्यात घेतले. चौकशीत तिने बाळाचे अपहरण केल्याची कबुली दिली.

अरूणा मांजरी बुद्रूक परिसरात वास्तव्यास लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होती. ती मिळेल ती कामे करून उदरनिर्वाह करते. तिने बाळाचे अपहरण का केले होते याचा तपास हडपसर पोलिस करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने,  प्रशांत टोणपे, प्रताप गायकवाड, प्रदीप सोनवणे, बजरंग धायगुडे, नितीन मुंडे, विनोद शिवले, सैदोबा भोजराव, समीर पांडुळे, संदीप राठोड, अकबर शेख, शाहिद शेख, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखील पवार, शशिकांत नाळे, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.