
कुर्ला ते चुनाभट्टी स्थानकादरम्यान जुने बांधकाम तोडत असताना ट्रकवर भिंत कोसळून मध्य रेल्वेच्या अप हार्बर मार्गावरील वाहतूक सायंकाळी तासभर विस्कळीत झाल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नसून सायं. 4.55 वाजता हार्बर मार्गावरी लोकलची वाहतूक पूर्ववत झाली.
कुर्ला आणि चुनाभट्टी स्थानकांदरम्यान जुने डीसी सबस्टेशनची इमारत पाडताना भिंतीचा भाग अप हार्बर मार्गावरच कोसळल्याने सायंकाळी सवाचारच्या सुमारास हार्बर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसून हे बांधकाम हटविण्यासाठी येथे छोटा ब्लॉक घेण्यात आला.
सायं.4.55 वाजता ट्रकवरील बांधकाम हटविण्याचे काम पूर्ण होऊन ट्रक मोकळा करण्यात आला. त्यानंतर हार्बरची वाहतूक पूर्ववत करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली. सध्या लोकलची दारे सर्वसामान्यांना अजूनही उघडली नसून अत्यावश्यक घटकांसाठी लोकल चालविण्यात येत आहे.


























































