पहिल्याच वन डेत हिंदुस्थानचा फ्लॉप शो, ऑस्ट्रेलियाचा 66 धावांनी दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेट संघाची या मोसमाची सुरुवात निराशाजनक झाली. यजमान ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी झालेल्या पहिल्या वन डे लढतीत विराट कोहलीच्या टीम इंडियाचा 66 धावांनी धुव्वा उडवत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सुमार गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण आणि स्टार फलंदाजांचा फ्लॉप शो या बाबी हिंदुस्थानच्या पराभवाचे कारण ठरल्या. अवघ्या 66 चेंडूंत 105 धावांची खेळी साकारणारा स्टीवन स्मिथ सामन्याचा मानकरी ठरला. दोन देशांमधील दुसरा वन डे सामना रविवारी रंगणार आहे.4

– आयपीएलमध्ये यश, तर आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये अपयश

हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मालिकेआधी यूएईमध्ये आयपीएलचा थरार रंगला. या स्पर्धेत लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मयांक अग्रवाल, हार्दिक पांडय़ा, युजवेंद्र चहल यांनी जबरदस्त कामगिरी केली, पण हिंदुस्थानसाठी आंतरराष्ट्रीय लढत खेळताना शिखर धवन, हार्दिक पांडय़ा वगळता एकाही खेळाडूला आपला ठसा उमटवता आला नाही. स्टीवन स्मिथ, अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल या ऑस्ट्रेलियन खेळाडूंना आयपीएलमध्ये अपयश आले, पण त्यांनी देशासाठी खेळताना घवघवीत यश मिळवले हे विशेष.

– खणखणीत सलामी

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंपून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार अॅरोन फिंच व डेव्हिड वॉर्नर या सलामीवीरांनी 156 धावांची सणसणीत भागीदारी करताना आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी हिंदुस्थानी गोलंदाजांचे आव्हान समर्थपणे थोपवून लावले. अर्थात मोहम्मद शमी वगळता हिंदुस्थानच्या इतर गोलंदाजांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करता आली नाही. तसेच ऑस्ट्रेलियन फलंदाजांना बांधून ठेवण्यातही त्यांना अपयश आले. मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर यष्टिरक्षक लोकेश राहुलकरवी 69 धावांवर बाद झाला आणि जोडी तुटली. त्याने या खेळीत सहा चौकार मारले.

– धवन, हार्दिकची झुंज

ऑस्ट्रेलियाकडून मिळालेल्या 375 धावांचा पाठलाग करणाऱया टीम इंडियाला एकामागोमाग एक असे धक्के मिळाले. मयांक अग्रवाल (22 धावा), विराट कोहली (21 धावा), श्रेयस अय्यर (2 धावा), लोकेश राहुल (12 धावा) यांनी धावफलकावर 101 धावा लागल्या असताना पॅव्हेलियनचा रस्ता पकडला. जोश हेझलवूड याने आखूड टप्प्याच्या चेंडूवर हिंदुस्थानचे प्रमुख फलंदाज बाद केले हे विशेष. त्यानंतर शिखर धवन (74 धावा) व हार्दिक पांडय़ा (90 धावा) यांनी 128 धावांची भागीदारी करीत टीम इंडियासाठी झुंज दिली. पण लेगस्पिनर अॅडम झाम्पाने हिंदुस्थानचे 4 बळी 54 धावांच्या मोबदल्यात मिळवत कांगारूंच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने लोकेश राहुलसह शिखर धवन, हार्दिक पांडय़ा व रवींद्र जाडेजा यांना बाद केले.

– दोन शतकवीर

डेव्हिड वॉर्नर बाद झाल्यानंतर अॅरोन फिंच व स्टीवन स्मिथ यांनी दमदार फलंदाजी पुढेही सुरूच ठेवली. दोघांनी 108 धावांची भागीदारी रचली. अॅरोन फिंचने 124 चेंडूंत दोन षटकार व नऊ चौकारांसह 114 धावांची खेळी साकारली. जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तो बाद झाला, पण त्याने या लढतीत वन डेतील 17 वे शतक झळकावत देशासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली होती. स्टीवन स्मिथनेही वन डेतील दहावे शतक झळकावताना टीम इंडियाच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली. त्याने 62 चेंडूंत शतक साजरे केले. त्याने आपली 105 धावांची खेळी चार षटकार व अकरा चौकारांनी सजवली. ग्लेन मॅक्सवेलने 45 आणि अॅलेक्स पॅरीने नाबाद 17 धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाला 6 बाद 374 धावा फटकावता आल्या. हिंदुस्थानकडून मोहम्मद शमीने 59 धावा देत 3 फलंदाज बाद केले.

आकडेवारीवर एक नजर

– ऑस्ट्रेलियाने या लढतीत 6 बाद 374 धावा तडकावल्या. हिंदुस्थानविरुद्ध त्यांनी वन डेत झळकावलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. याआधी त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध 359 धावा तडकावल्या होत्या.
– स्टीवन स्मिथने या लढतीत 62 चेंडूंत शतक झळकावले. सर्वात कमी चेंडूंमध्ये शतक झळकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज ठरला. याआधी ग्लेन मॅक्सवेलने 51 चेंडूंमध्ये तर जेम्स फॉकनरने 57 चेंडूंमध्ये शतक झळकावले होते.
– युजवेंद्र चहल याने 10 षटकांमध्ये 89 धावा दिल्या. वन डे क्रिकेटमध्ये हिंदुस्थानकडून सर्वाधिक धावा देणारा फिरकी गोलंदाज ठरला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया – 6 बाद 374 धावा (फिंच 114, स्मिथ 105, वॉर्नर 69, मॅक्सवेल 45, शमी 3-59) विजयी वि. हिंदुस्थान 8 बाद 308 धावा (धवन 74, हार्दिक 90, हेझलवूड 3-55, झाम्पा 4-54).