मंगरूळ येथे मायलेकावर बिबट्याचा हल्ला, तालुक्यात बिबट्याची दहशत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
leopard

शेतात तुरीच्या शेंगा तोडत असतांना अचानक एका महिलेवर व तिच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आष्टी तालुक्यातील मंगरूळ येथे शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. एकाच आठवड्यातील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

घटने बाबत हकीकत अशी की, मंगरूळ येथील दिंडे वस्तीवर शिलावती दत्तात्रय दिंडे (36) आणि मुलगा अभिषेक दत्तात्रय दिंडे (15) ही मायलेके शेतातील तुरीच्या पिकाच्या शेंगा तोडत असतांना बिबट्याने अचानक आई शिलावती दिंडे यांच्यावर हल्ला केला परंतु अभिषेक याने मोठया धाडसाने प्रसंगावधान राखत तुरीच्या पिकाच्या तुरट्या घेऊन बिबट्याच्या दिशेने धावून बिबट्याशी दोन हात करत आरडाओरडा केला आणि बिबट्याला पळवून लावले. अभिषेक याच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या हल्ल्यात शिलावती दिंडे किरकोळ जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तालुक्यात बिबट्याची दहशत झाली असून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे.

घटनेची माहिती मिळताच मंगरूळ येथे वानविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी धाव घेतली असून 50 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे.