विधीसंघर्षित बालकांसाठी पुण्यात बालस्नेही कक्षाची स्थापना, पोलीस ठाण्यातंर्गत राज्यातील पहिलाच उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील विधीसंघर्षित आणि पिडीत बालकांना विश्वास देऊन त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाचे उद्धाटन करण्यात आले आहे. आयआयटी कानपूरचे संचालक अभय करंदीकर यांच्या हस्ते कक्षाचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी होप फॉर चिल्ड्रेन फाऊंडेशनच्या संचालक कॅरोलीन अडोर, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, महिला व बालविकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होते.

करंदीकर म्हणाले, पीडित आणि विधीसंघर्षित बालकांना विश्वास देण्यासह त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे काम बालस्नेही कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांचा उपक्रम प्रशंसनीय असून अनेकांकडून याची दखल घेतली जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. जगभरातील अन्य देशांच्या तुलनेत हिंदुस्तानात बालकांची संख्या मोठी असून बालविवाह, त्यांच्यावरील अत्याचार, अल्पवयीन मुलांकडून होणारे गुन्हे विचारात घेऊन हॉप फॉर चिल्ड्रेन संस्थेकडून काम करण्यात येत असल्याचे अडोर यांनी नमूद केले. बालकांबरोबर महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे. सामान्यांना विश्वास देण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. लष्कर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी आभार मानले.

43ae4e44-6fad-4c5d-989f-d141f00aa4b0

राज्यातील पहिलाच बालस्नेही कक्ष

पुणे पोलिसांनी पुढाकार घेऊन बालस्नेही कक्षाची स्थापना केली आहे. त्यामुळे बालकांच्या तक्रारींचे निराकरण, गंभीर गुन्ह्यात सापडलेल्या अल्पवयीन मुलांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. त्याशिवाय बालकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने प्राधान्य देण्यात येणार आहे. राज्यातील बालस्नेही उपक्रम पहिलांदा पुण्यात राबविण्यात येत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. बालस्नेही कक्षाची संकल्पना ही बाल हक्क संरक्षण कायदा 2015 तसेच नॅशनल कमिशन ऑफ प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट यांनी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यरत करण्यात आली आहे. बालस्नेही कक्षाच्या भिंती विविध कलाकृतीनी रंगविण्यात आल्या आहेत. त्यामध्ये खेळणी, खुच्र्या-टेबल आणि पुस्तकेही ठेवण्यात आली आहेत.