मेट्रोकामादरम्यान पिलरवरून पडल्याने मजूर ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधीक

मेट्रोकामादरम्यान शटरचे नट बोल्ट काढत असताना पिलरवरून पाय घसरून खाली पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना कोरेगाव पार्क परिसरात घडली आहे. याप्रकरणी निष्काळजीपणाबद्दल साईट इन्जार्चविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

अभिनंदनकुमार नंदकिशोर रमाणी (वय 23, रा. येरवडा, मूळ- नागपूर) असे ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. याप्रकरणी साईड इंचार्ज विनयकुमार श्रीओमप्रकाश सिंग (वय 42) याच्यावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला उपनिरीक्षक मनीषा टूले यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध भागात मेट्रोचे कामकाज सुरू आहे. रस्त्यावर मोठमोठे पिलर उभे करून त्याठिकाणी काम केले जात आहे. कोरेगाव पार्क येथील बंडगार्डन मेट्रो स्टेशनचे पिलर क्रमांक 8 चे काम सुरू होते. त्याठिकाणी अभिनंदनकुमार व इतर मजूर काम करत होते. 10 मीटर उंचीचे पिलरवर बसवलेले शटरच्या नटबोल्ट काढण्याचे काम करत असताना अभिनंदनकुमारचा अचानक पाय घसरून खाली पडला. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. सुरक्षेच्यादृष्टीने कोणत्याही उपयोजना न केल्याने साईड इंचार्ज सिंग याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पार्क पोलीस तपास करत आहेत.