रेनबो ब्रिजवर लावल्या पुन्हा ऑलिम्पिक रिंग्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटामुळे ऑलिम्पिक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यानंतर टोकियो शहरातील प्रसिद्ध रेनबो ब्रिजवरील ऑलिम्पिक रिंग्ज चार महिन्यांपूर्वी हटविण्यात आल्या होत्या. मात्र, आगामी वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाची लगबग पुन्हा सुरु झाली असून, रेनबो ब्रिजवरील ऑलिम्पिक रिंग्जही पुन्हा बसविण्यात आल्या आहेत.

योकोहामा येथून एका व्रैजच्या मदतीने मंगळवारी पाचही ऑलिम्पिक रिंग्ज टोकियोमध्ये आणण्यात आल्या व रेनबो ब्रिजवर बसविण्यात आल्या. ऑलिम्पिक रिंग 33 मीटर रुंद 15.3 मीटर उंच व 69 टन वजनाची आहे. रिंग्जवर लायटींग लावण्यात आलेली आहे.

याआधी, जानेवारीमध्ये या ऑलिम्पिक रिंग्ज बसविण्यात आल्या होत्या. मार्चमध्ये कोरोनाचा हाहाकार सुरु झाला अन् त्यानंतर ऑलिम्पिक स्पर्धा वर्षभर पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेनबो ब्रिजवरुन या ऑलिम्पिक रिंग्जही हटविण्यात आल्या होत्या.

आता या रिंग्ज पुन्हा बसविण्यात आल्याने ‘आम्ही  टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी कटीबद्ध असल्याचे’ आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) दाखवून दिले आहे.

जुलैमध्ये होणार ऑलिम्पिक

लांबणीवर पडलेले टोकियो ऑलिम्पिक आगामी वर्षी 23 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. त्यानंतर टोकियोमध्येच पॅरालिम्पिक स्पर्धा 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान होतील. ‘आयओसी’कडून मिळालेल्या माहितीनुसार ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी जगभरातील 15,400 अॅथलिट टोकियोमध्ये येणार आहे.

कोविड नियमांचे पालन अनिवार्य

ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाआधी कोरोनावरील लस तयार झाली, तर सर्व खेळाडूंना आधी लस देण्यात येईल, असे ‘आयओए’ने स्पष्ट केले आहे. याचबरोबर सर्व खेळाडूंना कोविड नियमांचेही पालन करणे अनिवार्य असणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मर्यादीत प्रेक्षकांना परवानगी देण्याबाबतही ‘आयओसी’ प्रयत्नशील असणार आहे.