आयपीएलमध्ये येणार दोन नवे संघ, ‘बीसीसीआय’च्या आगामी बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संकटातही यूएईमध्ये ‘आयपीएल’च्या 13व्या हंगामाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर ‘बीसीसीआय’ने आता पुढच्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. आगामी वर्षी एप्रिल-मे महिन्यात ‘आयपीएल’च्या 14व्या हंगामाच्या आयोजनाचे नियोजन असून या टी-20 स्पर्धेत दोन नवे संघ घेण्यासाठी ‘बीसीसीआय’ने हालचाली सुरू केल्या आहेत. 24 डिसेंबरला होणाऱया ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

– अदाणी, गोयंका ग्रुप उत्सुक
‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सर्व संलग्न राज्य संघटनांची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर आगामी ‘आयपीएल’मध्ये दोन नव्या संघांचा समावेश करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. दोन नव्या संघांमध्ये अहमदाबाद फ्रैंचाइजीचे नाव पुढे आले आहे. या फ्रेंचाइजीला घेण्यासाठी अदाणी ग्रुप व गोयंका ग्रुप उत्सुक असल्याचे समजते. याचबरोबर दुसऱया संघासाठी पुणे, कानपूर व लखनौ या नावांची चर्चा आहे.

– जय शाह करणार देशाचे प्रतिनिधित्व
‘बीसीसीआय’च्या बैठकीत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) व एशियन क्रिकेट काऊन्सिलच्या (एसीसी) बैठकीसाठी नव्या प्रतिनिधीची निवड होणार आहे. यामध्ये ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांचे नाव आघाडीवर आहे. तीन नवीन संघनिवड सदस्यांबरोबरच संघनिवड समिती अध्यक्षपदाबाबतही या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे.