महाराष्ट्र दिनापासून शिर्डी ते नागपूर प्रवास समृद्धी महामार्गाने, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱया मुंबई-नागपूर या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गा’चे काम दर्जेदार तर झालेच पाहिजे; पण ते ठरलेल्या मुदतीत पूर्ण करण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर ते शिर्डीपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण होत आले असून हा मार्ग महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर सुरू होणार असल्याची खूशखबरही दिली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी अमरावती व संभाजीनगर येथे समृद्धी महामार्गाची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांचे सकाळी हेलिकाॅप्टरने अमरावती जिल्हय़ातील शिवना रसलापूर येथे आगमन झाले. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी विदर्भातील सुमारे 347 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेतला. महामार्गाच्या कामाची पाहणी करून ते संभाजीनगरकडे रवाना झाले. दुपारी 2 वाजता वैजापूर तालुक्यातील गोळवडी येथे उद्धव ठाकरे यांचे आगमन झाले. आगरसायगाव येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामाची पाहणी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या कामाचा आढावा घेण्यात आला.

या महामार्गासाठी शेतकऱयांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. शेतकऱयांच्या अडचणींचे, शंकांचे निरसन करून त्यावर मार्ग काढावा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपूर ते शिर्डीपर्यंतचा महामार्ग पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहे. महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर हा पहिला टप्पा महाराष्ट्रातील जनतेला लोकार्पण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रोहयो मंत्री संदिपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, अंबादास दानवे, उदयसिंह राजपूत, प्रा. रमेश बोरनारे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, रस्ते विकास महामंडळाचे संचालक राधेश्याम मोपलवार, अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि.प.चे सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, आदींची उपस्थिती होती. यावेळी उद्धव ठाकरे यांना रस्ते विकास महामंडळ व एल अॅण्ड टी कंपनीच्या वतीने तयार करण्यात आलेले पॉवर प्रेझेंटेशनही दाखवण्यात आले.

राज्याच्या सर्वांगीण विकासाचे रोलमॉडेल

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे या कामामध्ये विलंब झाला नाही. हा महामार्ग देशातील सर्वोत्पृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डीनंतर मुंबइपर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्पृष्ट सुविधांसोबतच कृषी व पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

असा आहे महामार्ग

  • 55 हजार 332 कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • महामार्गाची लांबी 701 किमी
  • मुंबई- नागपूर प्रवास आठ तासांमध्ये
  • दहा जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांना जोडणारा महामार्ग
  • ताशी 120 किमी वेगमर्यादा
  • महामार्गालगत 19 नवनगरांची उभारणी