निबंधकांची सभासदांच्या अधिकारांवर गदा, इमारतींची देखभाल-दुरुस्ती रखडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हौसिंग सोसायटय़ांच्या इमारतीची दुरुस्ती किंवा काही मोठे काम करण्यासाठी सिंकिंग किंवा रिपेअर फंड वापरता येतो. त्यासाठी नवीन मॉडेल बायलॉजनुसार (उपविधी) संस्थेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेण्याचा अधिकार कायद्याने संचालक आणि सभासदांना आहे. तरीही संस्थेला सिंकिंग आणि रिपेअर फंड वापरायचा असेल तर त्यांनी आधी सहकार विभागाची परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई केली जाईल असे अशी भूमिका वॉर्ड स्तरावरील निबंधक घेत आहेत. त्यामुळे हौसिंग सोसायटय़ांमध्ये नाराजी असून इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीची कामे लटकणार असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात जवळपास दोन लाखांहून अधिक हौसिंग सोसायटय़ा आहेत. या सोसायटय़ांच्या इमारतीची देखभाल-दुरुस्तीसाठी सभासदांकडून प्रत्येक महिन्याला सिंकिंग आणि रिपेअर फंड जमा केला जातो. 2002 पर्यंत सोसायटीचा सिंकिंग किंवा रिपेअर फंड वापरायचा असेल तर संबंधित निबंधकाची परवानगी घेणे बंधनकारक होते. मात्र त्यानंतर आलेल्या नवीन मॉडेल बायलॉजनुसार सिंकिंग किंवा रिपेअर फंड वापराचा निर्णय संस्थेच्या सर्वसाधारण सभेत घेण्याचा अधिकार दिला आहे. तसेच मार्च 2018 च्या राज्य सरकारच्या राजपत्रानुसार सहकार कायद्यामध्ये हौसिंग सोसायटीसाठी 13 (ब) चे प्रकरण अंतर्भूत करत ते लागू केले आहे. त्यानुसार सर्व खर्चाचा निर्णय घेण्याचा अधिकार सर्वसाधारण सभेला दिला आहे. तरीही निबंधक आपली परवानगी घ्यावी, अन्यथा कारवाई करू अशा नोटीस देत असल्याच्या तक्रारी मुंबई डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह फेडरेशनकडे येत आहेत. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करून हौसिंग सोसायटय़ांच्या अधिकारावर गदा आणणाऱया अधिकाऱयांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

हौसिंग सोसायटय़ांचा सिंकिंग आणि रिपेअर फंड खर्च करण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार संस्थेच्या सर्वसाधारण सभेला आहे. मात्र कोणी वॉर्ड स्तरावरील अधिकारी सहकार खात्याची परवानगी घ्या असे म्हणत असेल तर ते नियमाला धरून नाही. – जे. डी. पाटील, जिल्हा उपनिबंधक