
उद्योजक मिलिंद पोटे यांना कोरोना काळातील त्यांच्या अनुकरणीय, अविश्रांत समाज कार्यासाठी नुकताच सर्वात प्रतिष्ठित ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२०’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून सगळ्यांच्याच आयुष्यावर त्याचे वेगवेगळे पडसाद उमटले आहेत. अनेकांना वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान सहन करावे लागले आहे, मग ते नोकरी-व्यवसायाच्या बाबत असो, आपल्या प्रियजनांना गमावणं असो किंवा अजून काही. पण या कठीण प्रसंगातही काही हात गरजूंच्या सेवेसाठी निस्वार्थपणे अविरत झटत आहेत. उद्योजक मिलिंद पोटे हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. या अशा कठीण प्रसंगात समाजाच्या उपयोगी पडावे, सगळ्यांना सहकार्य करावे म्हणून ते अथक परिश्रम करत आहेत. त्यांचं सामाजिक कार्य निश्चितच वाखाणण्याजोगं आहे. केवळ सामाजिक कार्यच नव्हे तर छोट्या स्थानिक व्यवसायांना त्यांचा नेहमीच मोठा पाठिंबा राहिला आहे.
मिलिंद पोटे हे संभाजीनगरचे यशस्वी उद्योजक आहेत. त्यांनी एका छोट्या कॅफे पासून सुरुवात केली आणि बघता बघता तोकप्रिय क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्सच्या साखळीत आता त्यांची मक्तेदारी आहे. कॅफे पासून सुरुवात करून इथपर्यंत येणं नक्कीच सोपं नव्हतं पण पोटेंचं ध्येय अगदी स्पष्ट होतं. एक यशस्वी आणि सर्जनशील उद्योजक असण्याव्यतिरिक्त नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन (एनटीएसई) आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये ते गुणवंत होते. त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांमुळे शहरात नेहमीच नवी सुधारणा झाली आहे. त्यांनी केवळ संभाजीनगरच नव्हे तर मराठवाडय़ातही सर्वात मोठा गेम झोन गेम एक्स स्थापन केला आहे.
































































