फायझर लसीचा एकच डोस कोरोनाविरोधात प्रभावी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
pfizer

फायझर आणि बायोटेक यांनी बनवलेल्या कोरोनावरील लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर सुमारे 10 दिवसांच्या आत प्रभाव दाखवण्यास सुरुवात करतो. तसेच लस घेतलेल्यांचे संक्रमणापासून रक्षण होत असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनातील लस सल्लागार गटाने (यूएसएफडीए) प्रसिद्ध केलेल्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

फायझरकडील माहितीच्या आधारे अभ्यासानंतर हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात फायझर आणि बायोटेक यांनी जाहीर केले होते की, लसीचे दोन डोस डोस घेतल्यानंतर लसीचा 95% प्रभाव दिसून येतो. मात्र, आता नवीन अभ्यासानुसार या लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 10 दिवसातच प्रभाव दाखवण्यास सुरुवात करत असल्याचे दिसून आले आहे. लस घेणाऱ्याचा वंश, वजन आणि वय याचा लसीच्या प्रभावावर कोणताही परिणाम होत नसून ती सर्वांवर सारखीच प्रभावी असल्याचेही दिसून आले आहे. चाचणीत कोणत्याही स्वयंसेवकांवर लसीचे दुष्परिणाम दिसून आले नाहीत. मात्र, काहीजणांना ताप आणि अंगदुखीसारखा सौम्य त्रास जाणवला.

फायझर आणि बायोटेक यांनी जुलैपासून क्लिनिकल चाचणीला सुरूवात केली. त्यामध्ये अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटिनामधील 44,000 जण सहभागी झाले होते. त्यातील निम्म्या स्वयंसेवकांना लस देण्यात आली तर इतरांना प्लेसबो देण्यात आला. या अहवालानुसार पहिला डोस दिल्यानंतर 10 दिवसातच लसीचा संक्रमणाविरोधात प्रभाव दिसून आला. या लसीचा फायदा रुग्णालयातील आजारी रुग्णांनाही होऊ शकतो. त्यामुळे गंभीर आजारी लोकांनाही लसीचा फायदा होऊ शकतो.

पहिल्या डोसमुळे संक्रमणापासून बचाव होत असला तरी दुसरा डोस घेतल्यास संक्रमणापासून दीर्घकाळ संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले आहे. ही लस पुरुष आणि महिलांवरही समान प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तसेच कोरोना संक्रमणाचा जास्त धोका असलेल्या लठ्ठ लोकांवरही लस प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. तसेच 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लसीमुळे तरुणांइतकेच सुरक्षा मिळत असल्याचे दिसून आले आहे. चाचणीत सहभागी झालेल्या स्वयंसोवकांपैकी काहीजणांना थकवा, डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायू दुखणे असे सौम्य त्रास झाल्याचे दिसून आले आहे.