
फोर्ट येथील सोमय्या इमारतीमधील ‘किताब खाना’ पुस्तकाच्या दुकानात सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत हजारो पुस्तके जळून खाक झाली. आगीची माहिती मिळताच पालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेत बचावकार्य सुरू केले. दरम्यान, आगीत स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी 30 जणांची सुखरूप सुटका केली.
फोर्ट मुंबई हाऊस जवळ सोमय्या ही ‘ग्राऊंड प्लस चार’ मजल्यांची इमारत आहे. या ठिकाणच्या पुस्तकाच्या दुकानाला 5 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही आग लेव्हल – 2ची असल्याचे अग्निमशन दलाने जाहीर केले. सायंकाळच्या वेळेची ही दुर्घटना असल्याने जास्त जण आत नव्हते. मात्र सुमारे 30 कर्मचारी वरच्या मजल्यांवर होते. आगीचा धुरामुळे या कर्मचाऱ्यांना धोका निर्माण झाला होता. मात्र स्थानिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी या सर्वांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, आगीवर सायंकाळी 7.30 च्या सुमारास पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आले.




























































