थंडा थंडा स्कूल स्कूल! उणे 50 अंश तापमानात विद्यार्थी गिरवतात शिक्षणाचे धडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बहुतांश भागात थंडीच्या दिवसात शाळा एक तर बंद असतात किंवा उशिरा भरतात. मात्र जगातील सर्वात थंड भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सायबेरिया येथे उणे तापमान झाले तरी शाळा सुरू असतात. अगदी उणे 50 अंश तापमानात देखील मुलं शाळेत जातात.

एवढ्या कडाक्याच्या आणि हाड गोठवणाऱ्या थंडीत देखील येथील शाळा सुरू असतात. लहान लहान मुलं देखील स्वेटर, टोपी घालून शाळेत जातात. 11 वर्ष वय असणाऱ्या मुलांना तोपर्यंत शाळेत येण्यास बंदी घातली जात नाही जोपर्यंत येथील तापमान उणे 52 अंश होत नाही.

सायबेरियामधील ओएमयाकोन नावाच्या शहरात ही शाळा आहे. अतिशय दुर्गम भाग असणाऱ्या या शहरात प्रचंड थंडी पडते. या भागात देखील जगात हाहाकार उडवलेला कोरोना विषाणू धोकादायक बनला आहे. त्यामुळे शाळेत येण्यापूर्वी विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंबिय तसेच करचारी वर्ग यांची चाचणी करण्यात येते.

येथील शाळा 1932 ला स्टालिनच्या काळात सुरू करण्यात आली होती. तुमुल आणि बेरेग युर्ड गावातील मुलं येथे शिकायला येतात. स्थानिक फोटोग्राफरने 8 डिसेंबर रोजी येथे फोटोशूट केले तेव्हा येथील तापमान उणे 51 अंश होते.

स्वेटर, कानटोपी आणि हातात ग्लोअज घातले नाही तर येथे वावरणे अशक्य आहे. एवढ्या कमी तापमानात हायपोथर्मिया होण्याचा धोकाही असतो. यामुळे ब्लडप्रेशर वाढणे, घबराट होणे, हृदयाचे ठोके वेगाने पडणे अशी समस्या होऊन मृत्यूही होऊ शकतो.