
>> प्रताप आसबे
शरद पवार नखशिखांत राजकारणी आहेत. याही वयात त्यांची इच्छाशक्ती तेज आहे. राजकारणापलीकडे अनेक क्षेत्रांत ते वावरतात, पण राजकारण हाच त्यांचा प्राणवायू आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावरच दुर्धर आजारांवर मात करू शकले. कुबडय़ा घेऊनही लोकांत जाण्यास कचरले नाहीत. मी आहे असा आहे आणि लोकही असेच स्वीकारतील या विश्वासाने वावरतात. राजकारणाशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्याचा साधा विचारही त्यांना शिवत नाही, शिवणारही नाही.
शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणात पानही हलत नाही असे म्हटले जाते. गेली सहा दशके राज्याच्या राजकारणातील उन्हाळे-पावसाळे झेलणारा हा नेता कोणाच्याही मेहेरबानीशिवाय स्वाभिमानाने चार दशके देशाच्या राजकीय व्यासपीठावर उभा आहे. हा प्रवास सोपा नव्हता. इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी सत्ता मिळवली, लोकहितासाठी राबविली. गरिबीच्या खाईत होरपळणाऱया राज्याला प्रगतीच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी अपार मेहनत घेतली. हिमतीवर सत्ता मिळवली अन् राबविली. यशापयश, आरोप-प्रत्यारोप, बदनामी पचवत सत्तास्पर्धेच्या खाईतून झालेला हा प्रवास खडतरच होता.
पंडित नेहरू आणि संसदीय लोकशाही यांचा विलक्षण प्रभाव पवारांवर होता. भारतवर्षातील सगळय़ा वैविध्यांना सामावून घेत राष्ट्रबांधणीच्या कार्याला जुंपून घेतलेला काँग्रेस पक्ष त्यांना आदर्शवत होता. पक्षापेक्षाही पक्षाच्या विचारांशी बांधीलकी होती. आजही ते विचार त्यांना प्रेरणा देतात, प्रसंगी अस्वस्थही करतात. काँगेस पक्ष संपला तर देशाचे अस्तित्वच संपेल अशी भीती त्यांना वाटते. एकदा स्वतŠ काँग्रेस सोडल्यानंतर आणि काँग्रेसनेच एकदा त्यांची हकालपट्टी केल्यानंतर आजही काँग्रेस पक्ष आणि तिच्या विचारधारेबद्दल ते कमालीचे हळवे आहेत. काहींना हे पटणार नाही, पण ते वास्तव आहे.
पवार नेहरूंना आदर्श मानून राजकारणात सक्रिय झाले. यशवंतराव चव्हाणांच्या भेटीपूर्वीच नेहरूंच्या नेतृत्वाने ते प्रभावित होते. त्यातूनच काँग्रेसच्या राजकारणात ओढले गेले. त्यांचे घर शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित असतानाही डाव्या प्रभावापलीकडे जाऊन त्यांनी स्वतंत्रपणे त्यांचा राजकीय मार्ग निवडला. या स्वतंत्र बाण्यामुळे विवेकाला खटकणारे निर्णय त्यांनी कधीच स्वीकारले नाहीत. यातूनच बंडखोर पवार महाराष्ट्राला कळले. नेहरूंनंतर यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेसची सूत्रे आपल्या हाती घ्यावीत असे त्यांना प्रकर्षाने वाटायचे, पण चव्हाणांची हिंमत झाली नाही. नेहरूंच्या संसदीय लोकशाहीच्या वैचारिक संस्कारामुळेच इंदिरा गांधींचे अधिकारशाही राजकारण त्यांना मंजूर नव्हते. शिवाय, राजकारणातील हुजरेगिरीचा तिटकारा होता. त्यामुळे आणीबाणीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग पत्करला. तथापि, पक्षाच्या फारकतीनंतरही त्यांचा काँगेसचा जिव्हाळा आटला नाही, पण पक्षाची राजकीय संस्कृती अधोगतीला निघाल्याने इंदिराजींनी बोलावल्यानंतरही ते ‘त्या’ काँगेसमध्ये गेले नाहीत. संजय गांधींचे नेतृत्व स्वीकारण्यास तर त्यांनी साफ नकारच दिला. परिणामी त्यांना राज्याचे मुख्यमंत्रीपद गमवावे लागले. तरी त्यांनी पर्वा केली नाही. आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण काँग्रेसमध्ये परतले. पवारांनी तडजोड केली नाही.
अल्पवयात लाभलेल्या मुख्यमंत्रीपदाचे त्यांनी चीज केले. त्यांच्या माध्यमातून एक कार्यक्षम नेता आणि उत्तम प्रशासक महाराष्ट्राला लाभला. शक्तिशाली इंदिरा गांधींपुढे न झुकता स्वाभिमानाचे राजकारण करणारे नेते म्हणून देशात त्यांची ख्याती झाली. मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी ज्योती बसू, बिजू पटनाईक या देशातील दिग्गज विरोधी नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून हिंदुस्थानच्या संघराज्य पद्धतीत राज्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळाले पाहिजेत यासाठी केंद्राशी संघर्ष केला. साहाजिकच त्यांच्या नेतृत्वाभोवती वलय निर्माण झाले. लोकांच्या अपेक्षाही वाढल्या होत्या, पण इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव यांच्या नेतृत्वाखालील काँगेस वेगळी असेल या अटकळीने 86साली ते काँगेसमध्ये परतले. त्यांच्या राजकीय जीवनातील या चुकीची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. नाहीतर देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्यापेक्षाही दिल्लीच्या राजकीय जगतात पवारांचा दबदबा होता. काँग्रेसमध्ये परतण्याच्या निर्णयाने त्यांच्या प्रतिमेला खोलवर तडा गेला. राज्यातील लोकांचा आणि विशेषतŠ तरुणांचा मोठा अपेक्षाभंग झाला. त्यांच्या काँगेस प्रवेशाने महाराष्ट्राच्या राजकारणालाही मोठी कलाटणी मिळाली. काँगेसचे प्रमुख विरोधकच काँग्रेसमध्ये गेल्याने निर्माण झालेली राजकीय पोकळी अर्थातच शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भरून काढली.
तथापि, पवार राखेतूनही आकाशात झेपावणाऱया फिनिक्स पक्ष्याच्या जिगरीचे होते. त्यामुळे पुन्हा नव्याने त्यांनी सुरुवात केली. काँगेसमध्ये परतल्यानंतरही त्यांनी स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यामुळे पक्षनेतृत्वाला सतत त्यांची धास्ती वाटायची. या भीतीतूनच त्यांचे नेतृत्व खच्ची करण्याचे प्रयत्न राजीव गांधींपासून नरसिंह राव यांच्यापर्यंतच्या पक्षनेतृत्वाने केले. राजीव गांधींच्या काळात त्यांच्या विरोधात काँगेस नेत्यांनीच बंडाचे हाकारे घातले, तर नरसिंह रावांनी मुंबई दंगलीचे निमित्त साधत महाराष्ट्र सावरण्याच्या सबबीखाली इच्छेविरुद्ध दिल्लीतून पुन्हा महाराष्ट्रात पाठवले. सोनिया गांधी यांनी तर 99ला त्यांची पक्षातून हकालपट्टीच केली. मग दिल्लीतच पाय रोवून महाराष्ट्रात त्यांनी राष्ट्रवादी काँगेसच्या माध्यमातून पुन्हा फिनिक्सप्रमाणे राजकारणात झेप घेतली. ज्या काँगेसने त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला, त्याच काँगेसला बरोबर घेऊन राज्यात आघाडीचे सरकार स्थापन केले. कारण विचारांशी नाळ कायम होती.
एनडीएच्या कालखंडात ते काँगेस आणि विरोधकांच्या आघाडीत होते. तथापि, प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन वाजपेयी सरकारने कच्छच्या भूकंप पुनर्वसनात पवारांची मदत घेतली. आपत्ती निवारणाच्या त्यांच्या संकल्पनेतून एनडीआरएफ ही यंत्रणा देशात उभी राहिली. यूपीएचे सरकार आल्यानंतर खऱया अर्थाने पवारांमधल्या उत्तम प्रशासकाची प्रचीती आली. मनमोहन सिंग सरकार येण्यापूर्वी अन्नधान्यांच्या उत्पादनात देश परावलंबी होता. दरवर्षी गव्हातांदळाची मोठी आयात होत होती, पण पवारांनी प्रयत्नपूर्वक शेतीचे उत्पादन वाढवून देशाला अन्नधान्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. शेतकऱयांना शेती परवडण्यासाठी ते दरवर्षी किमान आधारभूत किमती वाढवत गेले. या प्रोत्साहनातून देशाच्या अन्नधान्य उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. इतकेच नव्हे तर धान्य आयात करणारा देश गव्हातांदळाचा प्रमुख निर्यातदार म्हणून ओळखला जायला लागला. एमएसपीच्या माध्यमातून शेतकऱयांच्या हाती चार पैसे आल्याने जगभरात आलेल्या आर्थिक मंदीतून हिंदुस्थान सहीसलामत बाहेर निघाला. कृषिमंत्रीपदाच्या दशकभर काळात मोठय़ा प्रमाणात संशोधन संस्था उभारल्या गेल्या. त्यातून कृषी संशोधन आणि प्रक्रिया यावरही मोठे काम झाले. ईशान्येतील राज्यांत भाताच्या उत्पादनात मोठी वाढ झाली, पण त्यांच्या या योगदानाचे ना काँगेसला कौतुक ना विरोधकांना अप्रूप! मनमोहन सिंगांना याची जाण असावी. गांधी घराण्याला तर पवारांचे मीठ अळणीच होते.
पवारांनी अशी उपेक्षा केंद्रासह राज्यातही पदोपदी अनुभवली. ती त्यांनी अलिप्तपणे स्वीकारली. याशिवाय, ‘मी हे केले, मी ते केले’, असे अवडंबर कधी माजविले नाही. त्यांच्या अनुयायांनाही कर्तृत्वाचा डांगोरा पिटू दिला नाही. महाराष्ट्राच्या कारभारात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. जे निर्णय करायला कोणी धजावणारही नाही, इतके ते ऐतिहासिक होते, धाडसी होते. मुस्लिम समाजातील ज्येष्ठ समाजसुधारक हमीद दलवाई यांच्यामागे ते खंबीरपणे उभे होते. अगदी त्यांच्या आजारपणातही. दलवाई यांनी मृत्यूनंतर आपणाला दहन करण्याची इच्छा मृत्युपत्रात नमूद केली होती. त्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी ए. बी. शाह, तळवलकर आणि पवारांवर होती. मुस्लिम प्रथा, परंपरेवर हा मोठा आघात होता, पण राजकीय परिणामांचा विचार बाजूला सारून पवारांनी मृत्युपत्रातील इच्छेनुसार अंमलबजावणी केली. याची राजकीय किंमतही त्यांना अदा करावी लागली, पण प्रागतिक विचारांशी त्यांनी तडजोड केली नाही. काही निर्णय समर्थक तसेच काँग्रेसजनांच्या इच्छेविरुद्ध जाऊनही घेतले. तेही त्यांना व्यक्तिशŠ महागात पडले. पण याची खंत त्यांनी कधीच कुठे दाखविली नाही. अगदी खासगीतही. कारभारातही ती खंत दिसणार नाही याची काळजी घेतली. पवारांनी आपला, परका असा भेद न करता असंख्य लेकांना मदत केली. ती मदत मात्र या कानाची त्या कानाला कळू दिली नाही.
पवारांना वेळोवेळी अनेकजण सोडून गेले. त्यांचा गैरफायदा घेतला, पण त्यांच्याविषयी त्यांनी कटुता बाळगली नाही. विरोधकांनी टोकाचे आरोप केले. तेव्हा सत्य कधीतरी लोकांना कळेल म्हणून खुलासे करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत. कालांतराने ते खरेही ठरले. सहनशक्ती हा त्यांच्यातील मोठा गुण. तिच्या जोरावरच त्यांचा राजकीय प्रवास झाला. दिलेला शब्द त्यांनी कसोशीने पाळला. ज्याची पूर्तता होणार नाही, त्याबद्दल शब्द दिला नाही. त्यांच्याकडे दांडगी श्रवणशक्ती आहे. समोरच्याचे म्हणणे ऐकण्याची सोशिकता त्यांच्यात आहे. त्यामुळे खुट्ट झाले तरी पवारांकडे पुरती खबर असते. राजकारणात सतत विरोधकांशी दोन हात करतानाही कोणाशीही शत्रुत्व जोपासले नाही. शरद पवार नखशिखांत राजकारणी आहेत. याही वयात त्यांची इच्छाशक्ती तेज आहे. राजकारणापलीकडे अनेक क्षेत्रांत ते वावरतात, पण राजकारण हाच त्यांचा प्राणवायू आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावरच दुर्धर आजारांवर मात करू शकले. मी आहे असा आहे आणि लोकही असेच स्वीकारतील या विश्वासाने वावरतात. राजकारणाशिवाय ते जगूच शकत नाहीत. त्यामुळे राजकारणातून निवृत्त होण्याचा साधा विचारही त्यांना शिवत नाही, शिवणारही नाही.
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)




























































