खेड – धक्कादायक ! शेळ्या चारायला गेलेल्या सख्ख्या भावांचा नदीत बुडून मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नदीकिनारी शेळ्या चारायला गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जगबुडी नदीत बुडून मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना नांदगाव येथे घडली. अबरार आरिफ कादरी (9) आणि जियाद आरिफ कादरी (6) अशी या दोन दुर्दैवी मुलांची नावे आहेत.

सहावी इयत्तेत शिकणारा अबरार आणि तीसरी इयत्तेत शिकणारा जियाद हे दोघे सख्खे भाऊ नांदगाव मोहल्ला येथील रहिवाशी असून ते दोघेही जगबुडी नदीकिनारी शेळ्या चारण्यासाठी गेले होते. नदीकिनारी शेळ्या चारत असताना जियाद याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडला. भावाला वाचविण्यासाठी अबरार हा गेला असता दुर्दैवाने त्याचाही पाय घरसला आणि तोही नदीपात्रात पडला. नदीपात्रात पाणी जास्त असल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. शेळ्या चारायला गेलेले दोघे भाऊ उशीरापर्यत घरी न परतल्याने त्यांचे कुटुंबिय आणि ग्रामस्थांनी शोध घ्यायला सुरवात केली. या शोधमोहिमेदरम्यान सायंकाळी उशीरा या दोघांचेही मृतदेह नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळून आले.

होडीच्या सहाय्याने हे दोन्ही मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. आपली दोन्ही मुलं जगबुडीने गिळंकृत केल्याचे पाहिल्यावर त्याच्या आई-वडीलांनी फोडलेला हंबरडा काळीज पिळवटून टाकणारा होता. या घटनेची खेड पोलिसात नोंद झाली असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.