लेख – जीवनदायी ऊर्जा…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिलीप जोशी

अवघे विश्व अमाप ऊर्जेने भरलेले आणि भारलेले आहे. आपल्या जीवसृष्टीचा जीवनदाता सूर्य हा तर ‘तप्त वायू’च्या घुसळणीतून गेली पाच अब्ज वर्षं साऱया गृहमालेला ऊर्जेचा स्रोत ठरलेला तेजोनिधी ठरला आहे. पृथ्वीवगळता इतर ग्रहांवर जीवसृष्टी नसेल परंतु तेही अंगभूत गतिज ऊर्जेने सूर्याभोवती फिरत आहेत. शिवाय आपली संपूर्ण सूर्यमाला आपल्या दीर्घिकेच्या केंद्राशी असणाऱया शक्तिशाली कृष्णविवराची परिक्रमा करत आहे.

विश्वनिर्मितीच्या काळापासूनच विश्व ऊर्जेने व्यापले आहे. परंतु त्याचे सर्वाधिक महत्त्व आपल्याला म्हणजे पृथ्वीवासीयांना असायला हवे. कारण आपण जेव्हा वीज, पाणी, दगडी कोळसा, खनिज तेल, बायोमास किंवा सागरी लाटा अशी ऊर्जेची विविध उगमस्थानं मानतो ती सारी पृथ्वीच्या निर्मितीनंतरची आहेत. सौरऊर्जा मात्र बाहेरून येणारा ‘स्वच्छ’ ऊर्जास्रोत असून तो अव्याहत आणि पृथ्वीव्यापी आहे. त्याची चर्चा करण्यापूर्वी परंपरेने आपण कोणते ऊर्जास्रोत विकसित केले ते पाहूया.

आदिमानवाला अग्नीचा शोध लागला, अन्न शिजवण्याची प्रक्रिया समजू लागली तेव्हा अरण्यातील लाकूडफाटा हे त्याच्या ऊर्चेचे प्रमुख साधन झाले. सूर्याच्या उन्हाचा जेवढा फायदा त्याला त्याकाळी नैसर्गिकरीत्या मिळायचा तो मिळतच होता आणि आजही मिळतो. मात्र जीवनाला गती आल्यावर आणि टप्प्याटप्प्याने विविध यांत्रिक ते इलेक्ट्रॉनिक शोध लागून त्याला वेग येण्याच्या काळात विविध ऊर्जापर्यायांची गरज आणि ‘गरज ही शोधाची जननी’ असल्याने त्या अनुषंगाने लागणारे शोध यातून ऊर्जास्रोतांचा विस्तार झाला.

लाकडाप्रमाणेच खाणीमधला दगडी कोळसा कित्येक शतके ऊर्जेचा मोठा स्रोत बनला. वनस्पती तेलबियांचा खाद्यवापर आणि इंधनवापरही सुरू झाला. अगदी अठराव्या शतकात वीज आणि रॉकेल नव्हते तेव्हा इंगुदीच्या तेलाचे दिवे, समया, झुंबरं ही प्रकाशऊर्जेची साधनं होती.

खनिजतेल आणि विजेच्या शोधाने जगाचे स्वरूपच बदलले. खनिज तेलाबरोबरच त्यातून येणारा ज्वलनशील वायू भरपूर ऊर्जा उपलब्ध करून देऊ लागला. मग वाहनं, यंत्र चालवण्यापासून ते स्वयंपाकाच्या गॅसपर्यंत ही ऊर्जा येऊन पोचली. त्याकाळी थोडे महाग पण वापरायला सुलभ असे ऊर्जापर्याय लगेच लोकप्रिय झाले. विजेच्या दिव्यांनी तर जगाची बारमाही दिवाळीच केली. ‘मिणमिणत्या शतपणत्या’ देऊ शकणार नाहीत एवढा प्रकाश हजार वॉण्डल पॉवरचा एक बल्ब देऊ लागला. समया, पलिते, टेंभे वगैरे इतिहासजमा झाले. त्यात उत्तरोत्तर सुधारणा होत अवघे जग उजळले.

या सर्व ऊर्जास्रोतांनी लखलखणाऱया आणि वेगवान झालेल्या विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात खनिज तेल आणि दगडी कोळसा तसेच जंगलतोड करून लाकडे जाळण्याचे दुष्परिणाम जाणवू लागले. कोळशाच्या आणि इतर रासायनिक धुरांच्या ढगांनी व्यापलेल्या लंडन शहरावर 1953 मध्ये मोठी आपत्ती ओढवली. ‘प्रगती’च्या नादात केवळ ‘गती’च मिळतेय पण ती नेमकी कुठे नेतेय ते जगाला कळेना. अर्थात या ऊर्जास्रोतांवर श्रीमंत आणि बलाढय़ झालेल्या देशांनी सुमारे शतकभर त्याविषयी बेफिकिरीच दाखवली. शेवटी वातावरणातील ओझोन वायू नष्ट व्हायला लागून संकट ‘कोसळणार’ याची जाणीव झाल्यावर जाग आली.

तरीही आधुनिक काळात छोटय़ाशा यंत्रापासून वेगवान रॉकेटपर्यंत सर्व गोष्टींना ऊर्जा तर लागणारच, मग 5 मार्चला जागतिक ऊर्जा दिवस घोषित करण्यात आला. हिंदुस्थानचा ऊर्जा दिवस मात्र डिसेंबर महिन्यात येतो. 1991पासून ‘ऊर्जा संवर्धना’ची मोहीम सुरू झाल्यापासून त्याला गती आली. जगातले खनिज तेल, दगडी कोळसा याचा पुरवठा अखेर मर्यादितच आहे. आणखी शे-दोनशे वर्षांनी त्याची टंचाई निर्माण होणार. तत्पूर्वीच नवे आणि प्रदूषमुक्त स्वच्छ ऊर्जास्रोत (क्लीन एनर्जी सोर्सेस) विकसित करून ते प्रभावीसुद्धा करावे लागतील. विद्युतनिर्मिती हा चांगला पर्याय. पण त्यासाठी औष्णिक वीजनिर्मितीला दगडी कोळसा लागतो आणि जलविद्युतनिर्मितीसाठी मोठी धरणं बांधावी लागतात. 2013पासून हिंदुस्थान हा जगातला तिसऱया क्रमांकाचा ऊर्जा वापर करणारा देश झाला आहे. आपण आपली ऊर्जेची पूर्तता सुमारे 56 टक्के कोळसा, 29 टक्के खनिज तेल, 6 टक्के नैसर्गिक वायू, 1 टक्का अणुऊर्जा, 4 टक्के जलविद्युत आणि 3 टक्के सौर व इतर ऊर्जास्रोत असे दोन-तीन वर्षांपूर्वीचे गणित आहे. आता त्यात बदल झाला असेल.

मात्र सौरऊर्जेची प्रभावी निर्मिती व वापरासाठी आपल्याकडे राजस्थानातील जोधपूरच्या उत्तरेला भादला येथे वाळवंटी भागात सुमारे 2200 मेगावॅट ऊर्जा देऊ शकेल असा विराट सौरऊर्जा प्रकल्प उभा राहतोय. 14000 एकर किंवा 57 चौरस किलोमीटर व्यापणाऱया या ऊर्जास्रोताने आपल्याला खूप मोठा दिलासा मिळेल. स्वच्छ ऊर्जेने पर्यावरणाचे रक्षण होईल. खनिज तेलासाठी परकीय चलनाच्या खर्चात कपात करता येईल असे प्रकल्प जगात अनेक ठिकाणी उभारले जातायत. पुढच्या पिढय़ांसाठी पृथ्वी स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक पिढीचे काम आहे. संकल्पाची ऊर्जा मनात असेल तर अशक्य काहीच नाही.