
मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी पूर्णपणे गेला नसताना नाईट क्लबमध्ये प्रचंड धिंगाणा सुरू असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईभरात गस्त घालण्यास सुरुवात केली असून रविवारी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत दादर, वांद्रे पूर्व, मालाड आणि कांदिवलीमधील चार नाईट क्लबवर कारवाई करण्यात आली आहे. या चारही क्लबना कारणे दाखवा नोटीस बजावली असून एका क्लबविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत 43 हजार 200 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
मुंबईत सर्वांसाठी लोकल कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्टीकरण देताना नाईट क्लबमध्ये सुरू असलेल्या धिंगाण्यामुळे रुग्ण वाढ होण्याची भीती व्यक्त केली होती. नाईट क्लबच्या बेजबाबदारपणामुळे मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत ‘नाईट कर्फ्यू’ लावण्यासाठी राज्य सरकारकडे आयुक्तांनी प्रस्तावही दाखल केला आहे. मात्र राज्य सरकारने नाईट क्लबना 20 डिसेंबरपर्यंत सुधारण्याची संधी द्यावी आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर विचार करावा असे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबईभरात रात्रीची गस्त वाढवली असून नाईट क्लबवर नजर ठेवली जात आहे. या धाडीत 50 जणांची परवानगी असताना हजारो नागरिक मास्क न घालता धिंगाणा घालत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेकडून अशा नाईट क्लबवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.
रविवारी मध्यरात्री अशी झाली कारवाई
वॉर्ड वेळ क्लबचे नाव दंड
एफ उत्तर 1 वा. प्रीतम हॉटेल 9800
एच पश्चिम 12 वा. बॉम्बे अड्डा 30000
पी उत्तर 11.45 वा. रुड लॉंज 1000
आर दक्षिण 11.59 वा. भगवती हॉटेल 2400
50 ची परवानगी, शेकडोंचा धिंगाणा
या कारवाईत वांद्रे पूर्वमधील बॉम्बे अड्डा नाईट क्लबमध्ये 275 नागरिक आढळले असून त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तर कांदिवलीमधील भगवती हॉटेलमध्ये 90 माणसे, मालाडच्या रुड लॉंजमध्ये 75 आणि दादरच्या प्रीतम हॉटेलमध्ये 120 माणसे आढळली. विशेष म्हणजे प्रचंड गर्दी असताना अनेकांनी मास्क घातले नव्हते. त्यामुळे या सर्वांना पालिकेने मास्कही दिले.
”मुंबईत सद्यस्थितीत कोरोना आटोक्यात आला असला तरी पूर्णपणे गेला नसल्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घ्यायलाच हवी. मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे, वारंवार हात धुणे हे नियम पाळले पाहिजेत. आगामी ख्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत.” – इकबाल सिंह चहल, पालिका आयुक्त































































