
कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे अनिवार्य केले असताना दररोज हजारो जण मास्कशिवाय फिरत आहेत. त्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांवर पालिकेने धडक कारवाई सुरू केली असून आतापर्यंत तब्बल 14 कोटींचा दंड वसूल केला आहे. विशेष म्हणजे सोमवारी फक्त एकाच दिवसात तब्बल बारा हजार जणांवर कारवाई करण्यात आली. दादर, माटुंगा, शीव, अंधेरी, गोरेगाव आणि मालाड आदी भागांत ही कारवाई करण्यात आली असून महापालिकेने त्यांच्याकडून 24 लाखांचा दंड वसूल केला आहे.
कोरोना रोखण्यात मास्क महत्त्वपूर्ण ठरत असल्यामुळे पालिकेने सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र तरीदेखील अनेक जण बेजबाबदारपणे विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे पालिकेने स्वतःचे कर्मचारी-अधिकारी आणि क्लीन-अप मार्शलच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू केली आहे. पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी तर दररोज 20 ते 24 हजारांवर कारवाई करावी असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून जोरदार कारवाई सुरू आहे. यानुसार सोमवारी एकाच दिवशी 12 हजार 71 जणांवर याप्रकरणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत 200 रुपयांचा दंड करून पावती देण्यात येत असून पालिकेकडून मास्कही पुरवला जात आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना नियंत्रणात आला असला तरी आगामी काळात विनामास्क फिरणाऱयांवर कारवाई कडक करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, 20 एप्रिलपासून आतापर्यंत 68 लाख 38 हजार 60 विनामास्क फिरणाऱया लोकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 14 कोटी 4 लाख 6 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
आतापर्यंत अशी झाली कारवाई
- परळ, दादर, शीव, माटुंगा, माहीम भागात सर्वाधिक 1 लाख 25 हजार 526 जण विनामास्क आढळून आले. त्यानंतर अंधेरी, गोरेगाव आणि मालाडमध्ये 1 लाख 4 हजार 666 विनामास्क लोकांचा समावेश होता.
- फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, गिरगाव, ग्रॅण्ट रोड भागात 98 हजार 484 लोक विनामास्क होते. बोरिवली, दहिसर, कांदिवली, विक्रोळी, भांडुप, मुलुंड या भागातदेखील विनामास्क फिरणाऱयाचे प्रमाण 90 हजारांच्या घरात होते.
- चेंबूर, गोवंडी, मानखुर्द भागात सर्वात कमी म्हणजे 77 हजार 534 जण विनामास्क आढळले. पालिकेने त्यांच्यावर कारवाई करत 24 लाख 14 हजार 200 रुपये वसूल केले.





























































