
काम संपवून घरी जाण्यासाठी मोटारीची वाट पाहत मोबाइलवर बोलताना इंजिनिअर तरूणीच्या हातातील मोबाईल हिसकाविणाऱ्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी पकडून येरवडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना काल मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास येरवड्यातील आयबीएम कंपनीसमोर घडली. याप्रकरणी 20 वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
राम आहुजी केदार (वय 23) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणी आयबीएम कंपनीत कामाला आहे. काल काम संपवून तरूणी कॅबची वाट पाहत कंपनीच्या गेटजवळ उभी होती. त्यावेळी रस्त्याने पायी चालत आलेल्या रामने तरूणीच्या हातावर फटका मारून मोबाईल घेतला. त्यामुळे तरूणीने आरडा-ओरड केल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आणि कंपनीतील कामगारांनी पाठलाग करून रामला पकडून पोलिसांकडे ताब्यात दिले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक हनुमंत भोसले तपास करीत आहेत.































































