
राज्याच्या बहुतांश भागात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानभरपाईपोटी शेतकऱ्य़ांना 2 हजार 297 कोटी रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. येत्या आठ दिवसांत 2 हजार 192 कोटी रुपये मदतीचा दुसरा हप्ता देण्यात येईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त विभागाचा दौरा केल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने 10 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले होते. या मदतीच्या पहिल्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्य़ांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. लवकरच दुसऱ्य़ा हप्त्याची रक्कम जमा करण्यात येईल. दरम्यानच्या काळात केंद्रीय पथकदेखील नुकसानीच्या पाहणीसाठी दौऱ्य़ावर येत आहे. राज्य सरकारने यापूर्वीच 3 हजार 721 कोटी रुपये मदतीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
41 हजार हेक्टर शेतपिकाचे नुकसान
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याच काम महसूल विभागाकडून अजूनही काही भागांत सुरू आहे. राज्यात 41 लाख हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानुसार पंचनामे झालेल्या शेतकऱ्य़ांना नुकसानभरपाईपोटी मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
केंद्राचे पथक 20 डिसेंबरला येणार
राज्य सरकारने अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्र सरकारकडे पाठविला होता. या अहवालावरून राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाने नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. 20 डिसेंबरला केंद्राचे पथक महाराष्ट्राच्या दौऱ्य़ावर येणार आहे.


























































