बनावट शालेय प्रवेशाची चौकशी करणार, दोषींवर कडक कारवाईचा रोहन बने यांचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर तालुक्यातील नवोदय विद्यालयात स्थानिक विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्याचे बंधन असताना कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील काही विद्यार्थी नवोदय विद्यालयात प्रवेश घेत आहेत. त्या प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना रत्नागिरीतील नवोदय विद्यालयात प्रवेश घेता येणार नाही, असे जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांनी स्पष्टपणे सांगितले.

नवोदय विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी तहसीलदारांकडून देण्यात येणारे रहिवासी प्रमाणपत्र संशयाच्या भोवऱयात सापडले असून हे प्रमाणपत्र कोणत्या कागदपत्रांच्या आधारे देण्यात आले, विद्यार्थ्याचे पालक कुठे राहतात याबाबत कागदपत्रांचा खुलासा जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी यापूर्वीच तहसीलदाराकडून मागवला आहे.

सध्या राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयात सहाव्या इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी तपासली असता बहुतांश विद्यार्थ्यांचे चौथीपर्यंतचे शिक्षण परजिह्यात झाल्याचे आढळून आले आहे. या प्रकरणाची रत्नागिरी जिल्हा परिषदेनेही गंभीर दखल घेतली आहे. आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे रोहन बने यांनी सांगितले.