मेट्रोची कामे वेळेत पूर्ण करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई मेट्रो प्रकल्प मुंबईकरांसह, महाराष्ट्रासाठी महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे या प्रकल्पातील कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मेट्रो कामांचा आढावा घेताना अधिकाऱयांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबई मेट्रोच्या चारकोप मेट्रो डेपोतील मेट्रोच्या इंजिनची मेट्रो मार्गिंकांवरील चाचणीच्या तयारी, अंधेरी एल-सेव्हन स्थानक, आपुर्ली मेट्रो स्थानक, दहिसर रेल्वे उड्डाणपूल (मेट्रो रेल ब्रिज), चारकोप मेट्रो डेपो आणि डी. एन. नगर मेट्रो स्थानक येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी अंधेरीतील प्रस्तावित गुंदवली आणि त्यानंतर कांदिवली येथील मेट्रो स्थानकांच्या विविध कामांच्या प्रगतीचाही आढावा घेतला. यावेळी आमदार रवींद्र वायकर, एमएमआरडीएचे आयुक्त आर. ए. राजीव, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह तसेच मेट्रोशी निगडित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.