
परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ साखर कारखान्यात मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे आता वैद्यनाथ साखर कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी मंत्री पंकजा मुंडे या कारखान्याच्या चेअरमन आहेत.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गोडाऊनमधील संगणक व इतर साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांनी दिली आहे. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.काही दिवस बंद असलेला कारखाना व लॉकडाऊन दरम्यान साखर कारखान्यामध्ये चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारखान्याचे स्टोअर कीपर जी. टी. मुंडे यांच्याकडून कारखान्याचे लिपिक खदिर शेख यांना चोरीची माहिती समजली. लिपिक आणि लीगल इन्चार्ज यांनी चोरीच्या ठिकाणाची पाहणी केली असता स्टोअर आणि वर्कशॉपच्या मागील बाजूचे शटर तोडल्याचे निदर्शनास आले. 13 ऑक्टोबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या चोरीबाबत तब्बल दोन महिन्यांनंतर कारखाना प्रशासनाला जाग आल्याचं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
स्टोअर व वर्कशॉप मधून कॉम्प्युटर साहित्य,200 किलो कॉपर मटेरियल, 400 किलो मिलबोरिंग, ब्रास इंपेरियर, बुश राउंड बार असे एकूण 37 लाख 84 हजार 914 रुपयाचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार कारखान्यातील लिपिक खदिर शेख यांनी दिली असून त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





























































