
अॅडलेड कसोटीत दणदणीत विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेणाऱया ऑस्ट्रेलियन संघाला मेलबर्न येथे होणाऱया दुसऱया कसोटीत डेव्हिड वॉर्नर व सीन अॅबोट या दोन खेळाडूंविनाच मैदानात उतरावे लागणार आहे. दोघांनाही दुखापत व कोरोना संबंधितचे कडक नियम यामुळे दुसऱया कसोटीत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही. हे दोन्ही खेळाडू पहिल्या कसोटीत खेळले नव्हते.
डेव्हिड वॉर्नर व सीन अॅबोट हे दोघेही सिडनी येथून मेलबर्न येथे रवाना झाले आहेत, मात्र हे दोघेही ऑस्ट्रेलियन संघासोबत नाहीत. दोघेही दुखापतीवर इतर ठिकाणी उपचार घेत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आपल्या खेळाडूंसाठी ‘बायो हब’ तयार करण्यात आलेला आहे. संघात निवड झालेल्या सर्व खेळाडूंना यामध्येच राहावे लागत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून खेळाडूंना दूर ठेवण्यासाठी हे कडक धोरण अवलंबले आहे. डेव्हिड वॉर्नर व सीन अॅबोट हे दोघेही बाहेर असल्यामुळे त्यांना दुसऱया कसोटीमधून बाहेरच राहावे लागणार आहे.
पण 7 जानेवारीपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीत दोघांचेही कमबॅक होणार आहे अशी माहिती क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून देण्यात आली. तसेच दुसऱया कसोटीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पर्यायी खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.
… तर सिडनीला अखेरच्या दोन कसोटी होणार
कोरोनामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया यांच्यामधील क्रिकेट मालिकेवर परिणाम झालाय. नियोजित वेळापत्रकानुसार सुरुवातीला कसोटी आणि त्यानंतर झटपट मालिका खेळवण्यात येणार होती, पण वेळापत्रकात बदल करावा लागला. त्यामुळे सुरुवातीला झटपट मालिका आणि त्यानंतर कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. आता सिडनी येथे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. दोन देशांमधील तिसरी कसोटी येथेच होणार आहे. पण सिडनी येथून येणाऱया व्यक्तींना क्वीन्सलॅण्ड येथे सूट देण्यात आली नाही तर दोन देशांमधील चौथी कसोटी ब्रिस्बेनऐवजी सिडनी येथेच होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास अखेरच्या दोन कसोटी सिडनी या ठिकाणी होतील.
पुजारासाठी आमच्या योजना तयार – लायन
दुसऱया कसोटीआधी ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा माइंड गेम सुरू झाला आहे. ऑफस्पिनर नॅथन लायन यावेळी म्हणाला, ही मालिका सुरू होण्याआधी चेतेश्वर पुजाराला कसे बाद करता येईल याबाबत विचार केला. अॅडलेड कसोटीत दोन वेळा आम्ही यशस्वीही ठरलो. आता आणखी दोन योजना तयार करण्यात आल्या आहेत. पुढल्या कसोटीत आम्ही त्याचा अवलंब करू, असेही तो पुढे आवर्जून म्हणाला.
























































