
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत 9 कोटी शेतकऱयांना 18 हजार कोटी रुपये दिल्याचा मोठय़ा थाटात गवगवा केला. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. त्या शेतकऱयांशी चर्चा करण्याऐवजी आपण शेतकऱयांचे किती कैवारी आहोत हे पटवून देण्याचा हा प्रयत्न आहे. शेतकऱयांच्या खात्यात 2 हजार जमा करण्याची योजना म्हणजे शेतकऱयांना आवळा देऊन आपल्या उद्योजक मित्रांना कोहळा देणारी योजना आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
The PM Kisan Sanman Yojana is yet another ‘event’ by PM Narendra Modi to show his govt is with the farmers. Rather than talking to the farmers sitting on the streets on Delhi against the farm laws, his govt has always attempted to divert attention from the real issues.
— Balasaheb Thorat (@bb_thorat) December 25, 2020
पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱयांशी साधलेल्या संवादावर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, मोदी सरकारने पेट्रोल डिझेलमध्ये आतापर्यंत 25 रुपयांची वाढ केली, खतांच्या किमती वाढवल्या, एमएसपी बंद केली जात आहे, सबसीडी बंद केली. शेतकऱयांचा उत्पादन खर्च हेक्टरी 30 हजार रुपये होता. त्यात आज मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे वर्षाला 6 हजार रुपये दिले तरी 24 हजार रुपयांची तफावत आहे.
उद्योगपतींचे आठ लाख कोटींचे कर्ज माफ
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या वार्षिक 54 हजार कोटी रुपयांसाठी सरकार कर्ज काढते. शेतकऱयाला वर्षाला 6 हजार रुपये म्हणजे दिवसाला 17 रुपये आणि महिन्याला 500 रुपये होतात. परंतु मोदी सरकारने 2015 ते 2019 या कालावधीत मूठभर उद्योगपतींचे तब्बल 7,94,354 कोटी रुपयांचे कर्ज (जवळपास 8 लाख कोटी रुपये) राईट ऑफ केले, असे वास्तव थोरात यांनी मांडले.



























































