कोल्हापूर शहरात आलेल्या गव्यांचा कळप परतला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर शहरात काल रात्री आलेल्या चार गव्यांचा कळप आज सकाळी पुन्हा आलेल्या वाटेने परत गेल्याचे निदर्शनास आल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लक्षतीर्थ वसाहत,सुतार मळा परिसरात  शुक्रवारी रोजी रात्री चार गव्यांच्या कळपाचे काहींना दर्शन झाले होते. याचे व्हिडिओ सोशल मिडियातुन व्हायरल झाल्याने परिसरात घबराट पसरली होती.याची माहिती मिळताच वन विभागासह अग्निशमन आणि पोलीस दलही घटनास्थळी दाखल झाले. खबरदारीसाठी या मार्गावरील वाहतूक तत्काळ बंद करण्यात आली होती. वन विभागाकडून या गव्यांचा रात्रभर शोध सुरू होता. पण दाट शेती तसेच झुडपांमुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाले होते.

दरम्यान आज शनिवारी पहाटे हे गवे प्रयाग चिखली मार्गे आलेल्या वाटेने परत त्यांच्या अधिवासात जंगलात परतले असल्याचे त्यांच्या पाऊलखुणांवरून निदर्शनास आले आहे. जंगलातील अन्नाचा व पाण्याचा तुटवडा यामुळे हे गवे शहरा लगतच्या शेतभागात आले असावेत. तसेच या कळपात दोन मोठे व दोन लहान असे चार गवे असुन मुख्य वन संरक्षक व्ही.क्लेमेंट बेन,उप वन संरक्षक काळे यांच्या मार्गदर्शन खाली वन परिक्षेत्र अधिकारी सुधीर सोनवणे, वनपाल विजय पाटील,वनरक्षक रुकेज मुल्लाणी आदीं वनविभागाचे पाच पथक या परिसरात तैनात करण्यात आल्याची माहिती वन्यजीव बचावकर्ता प्रदिप सुतार यांनी दैनिक सामनाशी बोलताना दिली.