आता मदार हिंदुस्थानी फलंदाजांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> द्वारकानाथ संझगिरी

ऍडलेडला हिंदुस्थान दुसऱया डावात सर्व बाद 36. आणि मेलबर्नला पहिल्या दिवसअखेर 1 बाद 36. मनातून 36 चा आकडा जात नसला तरी हिंदुस्थानी संघाने 36 चं दुःस्वप्न थोडंफार दूर ढकलून निदान सुरुवात तरी बरी केली. महाभारत शिकवतं की, झालेला अपमान हा रडण्यासाठी नसतो. तो विसरण्यासाठीही नसतो. वेळ आली की हिशेब चुकता करण्यासाठी असतो. अर्थात याक्षणी मी काहीही भाकीत करणार नाही. मी पहिल्या कसोटीत हिंदुस्थानी गोलंदाजी आणि पहिल्या डावातल्या हिंदुस्थानी फलंदाजीचं कौतुक केलं आणि उषःकाल होतंय असं वाटत असताना 36 धावांची काळरात्र आली. मी एवढंच म्हणेन, मेलबर्नला हिंदुस्थानी संघाला पहिला दिवस उत्तम गेला. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला, फलंदाजी घेतली आणि त्यांना आपण 195 धावांमध्ये उखडून टाकलं. आणि दिवसअखेर फक्त एकच बळी दिला ही केवढी तरी संतोषजनक गोष्ट.

आणि काही आनंदाच्या घटना घडल्या. 1) हैदराबादच्या रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा असलेल्या सिराजने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणात टँहा तरी जोरात केलं. 2) ही ऑस्ट्रेलियन फलंदाजी त्यांच्या आजपर्यंतच्या परंपरेत बसणारी नाही हे पुन्हा सिद्ध झालं. ना फटक्यांच्या बाबतीत ना आक्रमकतेच्या बाबतीत. स्मिथ हा त्यांच्या फलंदाजीचा गळा आहे. तो दाबला की ऑस्ट्रेलियन फलंदाजी तडफडायला लागते. ऍडलेडच्या पहिल्या डावाप्रमाणे ती येथेही तडफडली. एक लाबुशेन सोडला तर गेल्या दहा वर्षांत डेव्हिड वॉर्नरनंतर ऑस्ट्रेलियातून आलेला दर्जेदार फलंदाज पाहायला मिळालेला नाही. 3) हिंदुस्थानी गोलंदाजीला इशांत शर्मा नसणं, मोहम्मद शमी जायबंदी असणं वगैरे फारसा फरक पडत नाही. बुमराह हे डॉलरसारखं जगभर चालणारं नाणं आहे. तो गोलंदाज झाला नसता तर घटस्फोट मिळवून देणारा वकील म्हणून नावारूपाला येऊ शकला असता. तो सातत्याने जमलेल्या जोडय़ा तोडतो.

आणि या दौऱयात एक वेगळा अश्विन पाहायला मिळाला. 2018 साली इंग्लंडमध्ये रोझ बाऊलवर जवळपास अश्विनसाठी तयार झालेल्या बुटमार्कमधून अश्विन हिंदुस्थानला जिंकून देऊ शकला नव्हता. ती गोष्ट इंग्लंडसाठी मोईन अलीने केली. पण हा अश्विन वेगळा आहे. आक्रमक आहे. त्याने आपल्या गोलंदाजीत प्रचंड वैविध्य आणलंय. मग ते वेगवेगळ्या भात्यातील चेंडू असो किंवा फ्लाईट असो किंवा टप्पा व दिशा. त्याच्यातला आत्मविश्वास हा त्याच्या नसानसात जाणवतोय. गेल्या वेळेला त्याने स्मिथला ऑफ स्टम्पवरून बाहेर जाणाऱया स्लायडरवर बाद केलं होतं (हल्ली चेंडूची नावंही किती वेगवेगळी झालीत ना. कॅरम बॉल, स्लायडर वगैरे वगैरे). या वेळी त्याने चांगला ऑफस्पिनर जे पूर्वापार करत

आलेला आहे ते केलं. लेग ट्रपमध्ये त्याने फलंदाजाला फसवलं. मधल्या यष्टीवरून चेंडू वळवताना त्याने एक फॉरवर्ड शॉर्ट लेग आणि एक बॅकवर्ड शॉर्ट लेग ठेवला आणि त्याच्या या जाळ्यात स्मिथ व टीम पेन फसले. कोळ्याने फेकलेल्या जाळ्यात पापलेट फसावं तसे. काही वेळा माशांना जाळं दिसतं पण टाळता येत नाही. दोघांनाही जाळं दिसत होतं पण ते टाळता आलं नाही. अश्विनने आता या ऑस्ट्रेलियन फलंदाजांमध्ये एक वेगळा दबाव टाकलेला दिसतोय. पूर्वी ऑस्ट्रेलियन फलंदाज अशा दबावाला पुढे सरसावत भिरकावून देत. स्मिथ आणि इतर ऑस्ट्रेलियन फलंदाजांचं पुढचं उत्तर कसं असणार आहे हे मला पाहायला आवडेल. यावेळी खेळपट्टीने पहिल्याच दिवशी अश्विनला मदत केली. कदाचित खेळपट्टीमध्ये डॅम्पनेस असावा. आणि महत्त्वाचं म्हणजे, कर्णधार रहाणेने त्याला अकराव्या षटकात चेंडू हातात दिला आणि योग्य क्षेत्ररचना केली. अर्थात क्षेत्ररचनेप्रमाणे अचूक गोलंदाजीही गोलंदाजाला टाकावी लागते. अश्विनने तशी गोलंदाजी केली आणि फलंदाज जास्त ऑनसाइडलाच खेळतील असं पाहिलं. आणि म्हणूनच सर्व बाद 36 च्या कोमातून हिंदुस्थानी संघ शुद्धीवर आला. आता पुन्हा कोमात जाणार नाही हे हिंदुस्थानी फलंदाजांनी पाहायला हवं.