
अवैध वाळू वाहतूक करणाऱया तीन वाहनांवर जामखेड पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. यात तीन वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर तीन वाहनांसह सत्तर हजारांची वाळू जप्त करण्यात आली.
चालक रामहरी रमेश डोके (रा. भुतवडा ता. जामखेड), चालक परमेश्वर पांडुरंग पठाडे (रा. आष्टी, जि. बीड), चालक अरविंद रघुनाथ पवार (रा. शितपूर, ता. कर्जत) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पदभार स्वीकारल्यापासून अवैध धंद्यांवर धाडसत्र सुरू केले आहे. आज त्यांना माहिती मिळाल्यानंतर गायकवाड यांच्या पथकाने जामखेड-अरणगाव रस्त्यावर सापळा रचून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रक व एक हायवा ट्रक आणि 14 ब्रास वाळू जप्त केली. पोलीस पथकाने राजेंद्र नर्सरीजवळ, अरणगाव जामखेड रस्त्यावर पाटोदा शिवारात, अरणगाव-जामखेड रस्त्यावर एस्सार पेट्रोल पंपासमोर कारवाई केली. याप्रकरणी कॉन्स्टेबल संदिप राऊत, कॉन्स्टेबल संग्राम जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीस पथकामध्ये सहायक पोलीस निरीक्षक महेश जानकर, शिवाजी बोस, संजय लाटे, अविनाश ढेरे, आबा आवारे यांचा समावेश होता.





























































