कौतुकास्पद! ट्रान्सजेंडर महिलेने सुरू केले कॉफीशॉप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपल्या समाजात तृतीयपंथी, ट्रान्सजेंडर व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टीकोन अजूनही बदललेला नाहीये. त्यामुळे अशा व्यक्तींना अलिप्त आयुष्य जगावे लागते. परंतु कामाच्या ठिकाणी होणा-या शोषणाला कंटाळून नोएडा येथील 27 वर्षीय उरूज हुसैन या ट्रान्सजेंडर महिलेने वेगळी वाट निवडली आहे. नुकतेच तिने नोएडा सेक्टर 119 येथे स्वतःचे काॅफीशॉप सुरू केले असून ट्रान्सजेंडर समुदायासाठी तिचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.

याबाबत उरूज म्हणाली, कामाच्या ठिकाणी मला लैंगिक असामानतेला सामोरे जावे लागले. त्यामुळे मी नोकरी सोडून व्यवसायात उतरण्याचे ठरवले. माझ्या काॅफीशॉपमध्ये मात्र कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकसमान वागणूक दिली जाईल. सर्वसामान्य घरात उरूजचा जन्म झाला. तिचे शरीर मुलांचे असले तरी वागणे बोलणे मात्र मुलींसारखे होते. त्यामुळे कुटुंबीयांसह समाजात तिला टिकेला सामोरे जावे लागले होते.

पुढे ती म्हणाली, हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स पूर्ण केल्यानंतर 2013 साली मी दिल्लीत आले. इंटर्नशिपदरम्यान मला सहकाऱयांकडून चुकीची वागणूक मिळाली. काहींनी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याला कंटाळून मी स्वतःला काही महिने घरात बंद करून ठेवले होते. अनेकदा आत्महत्येचे विचारदेखील मनात आले. परंतु हिंमत न हरता मी स्वतःला या परिस्थितीतून सावरले.