
इंग्लंडहून मुंबईत परतलेल्या प्रवाशांपैकी आतापर्यंत 1450 प्रवाशांची पालिकेच्या माध्यमातून आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली असून यामध्ये 27 जण पॉझिटिव्ह निघाले आहेत. मात्र यातील 10 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे 17 इंग्लंड रिटर्न सक्रिय रुग्ण असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. या सर्वांचे नमुने जिनोम सिक्वेन्ससाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पुनर्तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या माध्यमातून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. यामध्ये 23 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून इंग्लंडहून येणाऱया विमानांना बंदी घालण्यात आली आहे. तर इंग्लंडमधून गेल्या महिनाभरात आलेल्या प्रवाशांचा शोध घेऊन कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूच्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात येत आहेत. यामध्ये पालिकेला राज्य सरकारडून मिळालेल्या लिस्टनुसार 2600 प्रवाशांपैकी आतापर्यंत 1450 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली असून 27 जण पॉझिटिव्ह आले आहेत.
दोन निगेटिव्ह अहवालानंतरच डिस्चार्ज
14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 तासांच्या अंतराने दोन कोरोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर डिस्चार्ज दिला जाणार आहे.
देशांतर्गत प्रवाशांपैकी 288 पॉझिटिव्ह
मुंबईत 1 डिसेंबरपासून आतापर्यंत सुमारे 50 हजार प्रवासी विमानमार्गे मुंबई विमानतळावर आले आहेत. यामध्ये परदेशातून 11 हजार 200 तर देशांतर्गत प्रवासात 39 हजार 500 प्रवासी आले आहेत. या सर्व विमान प्रवाशांची पालिकेच्या माध्यमातून कोरोना चाचणी करण्यात येत आहे.
या चाचण्यांमध्ये देशांतर्गत प्रवाशांच्या चाचणी 288 तर इंग्लंड वगळत इतर देशातून आलेल्या प्रवाशांच्या चाचणीत 81 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्वांच्या बाबतीत क्वारंटाइनच्या नियमानुसार कार्यवाही केली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.





























































