
अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सध्या घरघर सुरू आहे. ड्रग्ज प्रकरणात महिनाभर तुरुंगाची हवा खाऊन आल्यानंतर तिला सांताक्रुझच्या सोसायटीने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. वेळीच घर खाली करण्यासाठी सोसायटीने तिला नोटीस बजावली आहे. त्यामुळे ती आता खार परिसरात नव्या घराचा शोध घेत आहे.
रियासोबत तिचे वडील इंद्रजीत आणि आई संध्या यांनाही घरासाठी खार परिसरात भटकंती करावी लागली आहे. ही सर्व मंडळी फिरतानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर समोर आलेल्या बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरणात रियाचा सहभाग उघडकीस आला. त्यानंतर सांताक्रुझच्या सोसायटीने तिला घर खाली करण्यासाठी अल्टिमेटम दिला होता.
एनसीबीने तिला 8 सप्टेंबरला अटक केली होती. ती राहत असलेल्या फ्लॅटच्या परिसरात मीडिया व इतर लोकांच्या होणाऱया गर्दीमुळे सोसायटीवाले त्रस्त आहेत. ती तुरुंगात राहिल्यामुळे सोसायटीवाल्यांना महिनाभर गर्दीची कटकट नव्हती. मात्र आता तुरुंगाबाहेर येताच तिच्यावर सोसायटीने दबाव वाढवला आहे.
रिया स्वतःसुद्धा मीडियाच्या गर्दीला वैतागली आहे. तिने ऑगस्टमध्येच मीडियाच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर केला होता. त्यावेळी तिने मुंबई पोलिसांकडून संरक्षणाची मागणी केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही छायाचित्रकारांनी तिचा पिच्छा सोडलेला नाही. त्यामुळे मीडियापासून स्वतःचा बचाव करण्याच्या दृष्टीने ती नवीन घर शोधत आहे.
































































