भुतांच्या भितीमुळे शेतकऱ्यांनी ‘या’ गावात 3 वर्षं शेतीच केली नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मथळा वाचून आश्चर्य वाटेल, पण हे वृत्त खरं आहे. देशाने आज विज्ञान तंत्रज्ञानात प्रगती केली असली तरी आजही अनेक भागात अंधश्रद्धा पाळली जाते. याचं ताजं उदाहरण झारखंडच्या एका गावात पाहायला मिळालं आहे.

झारखंडमधील चतरा जिल्ह्यात 27 किलोमीटर अंतरावर असलेल्या पितीज गावांत एक विचित्र घटना घडली आहे. या गावातील लोकांनी गेली तीन वर्षं भुतांना घाबरून धान्याची कापणी केलेली नाही. शेतातील धान्याची कापणी न केल्यामुळे बरेचसे खराब झाले आहे. ग्रामदेवतेचे पूजन न झाल्यामुळे भूत-प्रेताच्या बाधेचे संकट गावावर ओढवते, ही अंधश्रद्धा आजही या गावात पाळली जाते.

धान्य कापलं तर संकट येतं

धान्याची कापणी केली तर गावावर संकट येईल, तसेच जर कापणी केलेले धान्य कोणी घरी घेऊन गेले तर त्या कुटुंबाला भूत त्रास देते किंवा कुटुंबात एखादी अशुभ घटन घडते, अशी अंधश्रद्धा आजही पितीज गावात पाळली जाते. याबाबत गावचे गावकरी संजय यादव यांनी सांगितले की, शेतीचा मालक पूजा करत नाही, यामुळे गावावर अरिष्ट येते. या समजातून येथील लोकं भूत-प्रेताला घाबरून शेती करत नाहीत, मात्र धान्याची कापणी करण्यापूर्वी गावात ग्रामदेवतेची पूजा केली जाते.

गावातील शेतमालकाकडून ग्रामदेवतेची पूजा न करता धान्याची कापणी केली तर अप्रिय घटना घडू शकते, अशा गैरसमजामुळे धान्याची कापणी न केल्यामुळे शेतातील बरेच धान्य गावकऱ्यांनी वाया घालवले आहे. जोपर्यंत शेतमालक ग्रामदेवता आणि कुलदेवतेची पूजा विधीपूर्वक करत नाही तोपर्यंत गावातील भूतांकडून गावकऱ्यांना कोणत्या ना कोणत्या तरी अडचणींना सामोरं जावच लागतं, अशी माहिती गावकरी प्रकाश कुमार आणि खेमलाल यादव देतात.

3 वर्षे शेतीच केली नाही…

सध्याच्या आधुनिक काळातही अंधश्रद्धेतून गावकरी बाहेर येत नाहीत. पारंपरिक अंधविश्वास आजही जोपासला जात आहे. भूत-प्रेतांच्या भीतीमुळे गावकऱ्यांनी 3 वर्षे शेतीच केली नाही. गावकऱ्यांमध्ये असलेली अंधश्रद्धा आणि गैरसमजातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक कार्यकर्ते अनिल मिश्रा येथे अंधश्रद्धेविरुद्ध जागरुकता अभियान राबवत आहेत.