
राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्यसेवा उपलब्ध करुन देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेतांनाच भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेली घटना यापुढे राज्यात कुठेही घडणार नाही तसेच शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही निष्पाप जीवाचा बळी जाता कामा नये. यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रीकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयातील आग लागलेल्या शिशू केअर युनिटची पाहणी केली. या घटनेमधून वाचविण्यात आलेल्या सात बालकांवर सुरु असलेल्या उपचाराची माहिती घेतली. तसेच त्यांच्या कुटूंबियांसोबत संवाद साधला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, भंडारा येथे घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून तिच्या कारणांचा शोध घेण्यात येईल. राज्यातील सर्व रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडीट सक्तीचे करण्यात येणार असून यंत्रसामुग्री घेण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिल्या जाईल. या घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी तज्ञ व्यक्तींची मदत घेण्यात येणार आहे. ही घटना कुणाच्या दुर्लक्षामुळे घडली तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी व्यवस्थेत असलेल्या उणीवा व त्रुटींची सर्वंकष चौकशी करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले.
घटनेसंदर्भातील कारणांचा शोध घेतल्यानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा सज्ज करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शिशू केअर युनिटला आग लागल्याचे माहिती पडताच फायर एक्स्टींग्विशद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न करणारे सुरक्षा रक्षक तसेच अग्निशमन दलाच्या जवानांसोबत मुख्यमंत्र्यांनी संवाद साधून त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाला लागलेल्या आगीसंदर्भात संपूर्ण घटनाक्रमाची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्याकडून घेतली.
विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी
जिल्हा सामान्य रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येणार आहे. या समितीमध्ये तज्ञ म्हणून मुंबई अग्निशमन विभागाचे प्रमुख पी.एस. रहांगडाले यांचा समावेश राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज भंडाऱ्यातील भोजापूर येथे जाऊन दुर्दैवी कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
या पालकांचे सांत्वन करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत इतकं हे प्रचंड दुःख आहे, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. pic.twitter.com/xfU3jxu9tY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 10, 2021
त्यासोबतच आरोग्य सेवा संचालक व इतर विभागांच्या तज्ञांचाही या समितीमध्ये समावेश असल्याचे माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. या समितीला आपला अहवाल तात्काळ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे. या समितीच्या अहवालानुसार आगीचे नेमके कारण शोधल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील इतर रुग्णालयातही या समितीने सुचविलेल्या सूचना लागू करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भंडारा जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. या घटनेच्या चौकशीसाठी विभागीय आयुक्त यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असून या पथकात मुंबई मनपातील अग्निशमन दल प्रमुख यांचा समावेश असेल. या घटनेतील दोषींवर त्वरित कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. pic.twitter.com/IhPyCToz8G
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 10, 2021






























































