
पँगाँग सरोवराच्या दक्षिण भागातून चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीच्या (पीएलए) एका जवानाने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीत घुसखोरी केली होती. त्या सैनिकाला हिंदुस्थानी लष्कराने ताब्यात घेतले असून योग्य प्रक्रिया पूर्ण करून चीनच्या ताब्यात दिले जाणार आहे. तत्पुर्वीच चीनने मग्रुरीची भाषा सुरु केली असून दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी वेळ न दवडता संबंधित सैनिकाला तत्काळ सोडावे अशी मगाणी केली आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून हिंदुस्थानच्या हद्दीत घुसलेल्या चीनच्या जवानाला लष्कराने शुक्रवारी पहाटे ताब्यात घेतल्याची माहिती शनिवारी हिंदुस्थानने चीनला दिली आहे. तसेच हा सैनिक कोणत्या परिस्थितीत सीमा पार केली याचा हिंदुस्थानकडून शोध सुरु आहे. दरम्यान अंधार आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे एक सैनिक हिंदुस्थान-चीन सिमेवर बेपत्ता झाल्याची माहिती चीनने दिली होती. त्याला दोन तासात हिंदुस्थानी लष्कराने प्रतिसाद देत बेपत्ता जवान सापडल्याचे स्पष्ट केले होते. तसेच सक्षम प्रधिकरणाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया पुर्ण करून त्याला चीनकडे सोपवले जाईल असेही हिंदुस्थानने स्पष्ट केलेले आहे. तरीही चीनने मग्रुरीची भाषा करत दोन्ही देशामध्ये असलेला तणाव कमी करण्यासाठी तत्काळ सैनिकाला चीनकडे पाठवले पाहिजे असे म्हटले आहे. दरम्यान यापुर्वी 19 ऑक्टोबर रोजी लडाखमधील डोमचोक सेक्टरमध्ये एका चीनी सैनिकाला हिंदुस्थानी लष्कराकडून ताब्यात घेण्यात आले होते. त्यालाही सर्व नियमांचे पालन करून चीनकडे सोपवले होते.




























































